पद्दुचेरी – ऑल इंडिया एन. आर. काँग्रेसचे नेते एन. रंगास्वामी यांनी पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्रिपदाची शुक्रवारी शपथ घेतली. राजनिवास येथील छोटेखानी समारंभात हा कार्यक्रम झाला. उपराज्यपाल तामिलसाई सौंदराराजन यांनी शपथ दिली.
एन. आर. काँग्रेसने भाजपसह मिळून येथे सरकार बनवले आहे. भाजपचे ए. नमासिवायम यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड होऊ शकते. त्यांना धरून सहा मंत्र्यांचाही येत्या काही दिवसांत शपथविधी होऊ शकतो.
30 सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत निवडणुकीत एनआर काँग्रेसने 10 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपने सहा जागा जिंकल्या होत्या. या केंद्रशासित प्रदेशात सहा अपक्ष आमदार निवडून आले आहेत. ते सर्व रंगास्वामी यांचेच समर्थक आहेत. द्रमुकने 6, तर काँग्रेसने 2 जागा जिंकल्या आहेत. एन. रंगास्वामी यांनी 2011 मध्ये काँग्रेसमधून फुटून स्वत:चा एन. आर. काँग्रेस पक्ष स्थापन केला. 2014 पासून ते रालोआसोबत आहेत.






