इंदूर (मध्यप्रदेश) – कोरोनामुळे देशात सर्वत्र विदारक स्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोनातून बरे होत असले तरी एखाद्या ठिकाणी पूर्ण कुटुंबावर कोरोनामुळे मोठे संकट आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शनिवारी इंदूरमध्ये अशीच एक दुःखद घटना घडली. कोरोनामुळे पतीचे निधन झाल्याचे दुःख सहन न झाल्याने पत्नीने रुग्णालयातच सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह होते, पण पतीची तब्येत जास्त बिघडली होती.
पतीचा मृतदेह पाहिल्यानंतर या महिलेने सहाव्या मजल्यावर जाऊन तेथून खाली उडी मारली. या प्रकारामुळे रुग्णालयात मात्र चांगलाच गोंधळ निर्माण झाला. सहाव्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. खुशबू असे या महिलेचे नाव असून राहुल जैन असे तिच्या पतीचे नाव होते. हे दोघे येतील आशिषनगरमध्ये राहत होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर ते शैल्बी रुग्णालयात दाखल झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार 24 एप्रिलपासून राहुलवर या रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी संध्याकाळी राहुलच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर खुशबू रुग्णालयात पोहोचली. मात्र, पतीच्या मृत्यूचे दुःख ती सहन न करू शकल्याने तिनं आत्महत्या केली. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून रुग्णालयाच्याही सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.






