नाशिक (विशेष प्रतिनिधी) – येथील शिवसेना नगरसेविका सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांचं निधन झालं. कोरोनावरील उपचारादरम्यान गाडेकर यांची प्राणज्योत मालवली. गाडेकर यांनी शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख म्हणून अनेक वर्ष धुरा सांभाळली आहे.
सत्यभामा गाडेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सत्यभामा गाडेकर कोरोना काळातही जनतेसाठी झोकून देऊन काम करत होत्या. जनसेवा करतानाच अखेर गाडेकरांनाही कोरोनाने गाठले. त्यांच्या निधनाने शिवसैनिकांना जबरदस्त धक्का बसला आहे.
सत्यभामा गाडेकर यांनी नाशिक महापालिकेत नगरसेवकपद भूषवले आहे. या नाशिक प्रभाग क्रमांक ’22 ब’ चे प्रतिनिधित्व करत होत्या. नाशिक महापालिका स्थायी समितीच्याही त्या सदस्या होत्या. गाडेकर शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख होत्या. त्यांच्या निधनाने महिला आघाडीला मोठा धक्का बसला असून मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.






