नासिक (विशेष प्रतिनिधी) – कारागृहात कोरोनाची घुसखोरी टाळण्यासाठी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. आतापर्यंत 97 कैद्यांना महापालिकेच्या सिन्नरफाटा येथील लसीकरण केंद्रात कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. आता कारागृहातच सर्व 2400 कैद्यांना लस देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कारागृहात लसीकरण केंद्र उघडून लस देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आणि महापालिका कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती कारागृहाच्या सूत्रांनी दिली.
सिन्नरफाटा येथे 97 कैद्यांना नुकतेच कोविड लसीकरण करण्यात आले. त्यात स्त्री व पुरुष कैद्यांचा समावेश आहे. कारागृहात एकूण 2400 कच्चे व पक्के कैदी असून त्यांना करोना होऊ नये म्हणून लसीकरण करणे गरजेचे आहे. मात्र एवढ्या कैद्यांना कारागृहाबाहेर शासकीय अथवा खासगी केंद्रावर लसीकरणासाठी नेणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे.
तसेच कैदी वाहतुकीच्या दृष्टीनेही अवघड आहे. त्यामुळे कारागृहातच लसीकरण केंद्र सुरु करुन लस देण्याचे नियोजन कारागृह प्रशासनाने केले आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी व महापालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सध्या सर्वच ठिकाणी कोवीड लसीची टंचाई आहे. पुरेसा साठा उपलब्ध झाल्यानंतर कारागृहातील केंद्रासाठी लस मिळणार आहे. ती मिळताच सर्वच वयोगटातील कैद्यांचे लसीकरण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ अधिकारी अशोक कारकार यांच्या मार्गदर्शनाखाली तसे नियोजन करण्यात आले आहे. सध्या करोना रोखण्यासाठी कैद्यांना थेट कारागृहात प्रवेश न देता के. एन. केला शाळेतील तात्पुरत्या जेलमध्ये ठेवण्यात येत आहे. तेथेही लसीकरण केले जाणार आहे. प्रत्येक नव्या कैद्याची करोना चाचणी करण्यात येत आहे. तसेच अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना, शासकीय व न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात आहे. त्यामुळेच कारागृहातील कैद्यांचे करोनापासून संरक्षण करण्यात प्रशासनाला यश आले आहे.






