नवी दिल्ली – ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी सोमवारी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. दिल्लीतील मॉडेल टाऊन भागातील छत्रसाल स्टेडियमवर पैलवानांच्या दोन गटांत मंगळवारी हाणामारी झाली होती. यामध्ये पाच पैलवानांना गंभीर दुखापत झाली होती. त्यापैकी सागर नावाच्या २३ वर्षीय पैलवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सुशील कुमारसह पाच जणांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सुशील कुमारशिवाय २० अन्य आरोपींचाही पोलिसांना शोध आहे. दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर पैलवानांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत २३ वर्षीय सागर राणाचा मृत्यू झाला होता. मॉडेल टाऊन परिसरातील फ्लॅट रिकामा करण्यावरुन पैलवानांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. सागर राणा हत्या प्रकरणात सुशील कुमारचेही नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिल्ली एनसीआरसोबतच शेजारी राज्यांमध्येही छापेमारी करुन सुशील कुमारचा शोध घेतला जात आहे.
मृत पैलवान सागर राणा हा आपल्या मित्रांसोबत छत्रसाल स्टेडियमजवळील मॉडेल टाऊन परिसरातील एका घरात राहत होता. ही जागा रिकामी करण्यावरुन गेल्या मंगळवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये बेदम हाणामारी आणि गोळीबारही झाल्याचा आरोप आहे. यावेळी सुशील कुमारही उपस्थित असल्याचा दावा पीडितांनी केला आहे.






