मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तम ‘कोविडॉलॉजिस्ट’; सामनाच्या अग्रलेखातून स्तुतिसुमने

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुख्यमंत्री ठाकरे या संकटकाळात जणू ‘कोविडॉलॉजिस्ट’च झाले. त्यांनी या संकटाचा खोलवर अभ्यास केला व आता महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचे फॅमिली डॉक्टर बनून ते झोकून काम करीत आहेत. लोकांना हिंमत देण्याचे आणि संकटाशी लढण्याचे आत्मबळ देण्याचे काम फॅमिली डॉक्टर बनून मुख्यमंत्री ठाकरे करत आहेत. त्यांचे हात मजबूत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे, असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात कोरोना रुग्णसंख्येत झालेली घट याबाबतचे भाष्य करण्यात आले आहेत.

कोरोनाचा परिपूर्ण अभ्यास आणि त्यानुसार प्रभावी उपायांची काटेकोर अंमलबजावणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी महाराष्ट्र करीत आहे. महाराष्ट्राच्या जनतेला अशा संकटसमयी मुख्यमंत्र्यांचा आधार वाटतो, हे दिलासादायक आहे. मुख्यमंत्री ठाकरे या संकटकाळात जणू ‘कोविडॉलॉजिस्ट’च झाले. त्यांनी या संकटाचा खोलवर अभ्यास केला व आता महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचे फॅमिली डॉक्टर बनून ते झोकून काम करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्राला धोक्याची पातळी ओलांडू दिली नाही. लोकांना हिंमत देण्याचे व संकटाशी लढण्याचे आत्मबळ देण्याचे काम फॅमिली डॉक्टर बनून मुख्यमंत्री ठाकरे करत आहेत. त्यांचे हात मजबूत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे, असा सल्ला शिवसेनेनं अप्रत्यक्षरित्या विरोधकांना दिला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘कोविड-19, कोरोना संकट व उपाययोजना’ यासंदर्भात केलेले सखोल अध्ययन महाराष्ट्राच्या कामी येत आहे. प्रत्येक मुख्यमंत्र्याची एक खासियत असते. कोणी शिक्षण क्षेत्रात, कोणी शेती किंवा सहकारात, कोणी अर्थ क्षेत्रात पारंगत असतात. सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाशी लढा व त्याबाबत जनतेला मिळणाऱ्या आरोग्य सुविधा यातच ‘नैपुण्य’ प्राप्त केले असून आज संपूर्ण देशाला त्याचीच गरज निर्माण झाली आहे. देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन राजकीय आंदोलनासाठी रस्त्यावर उतरत होते तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाशी कसे लढावे याबाबत तज्ञांशी सतत संवाद साधत होते. जगभरातील प्रसिद्धी माध्यमांत भारतातील प्रेतांचा खच, स्मशाने आणि कब्रस्तानांतील चेंगराचेंगरी याबाबत वार्ता आणि मन हेलावून टाकणारी छायाचित्रे रोजच प्रसिद्ध होत आहेत. त्यात महाराष्ट्र दिसत नाही याचे श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच नाही द्यायचे तर कोणाला द्यायचे? असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सच्या तज्ञ डॉक्टरांबरोबरच हजारभर ‘फॅमिली डॉक्टरां’शी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले की, ‘आतापासूनच लहान मुलांवर लक्ष द्या. मुलांमध्ये आढळणारे जे व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, ताप, खोकला, डायरिया, दूध न पिणे, भूक न लागणे या लक्षणांकडे खास लक्ष द्या,’ अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. हे एका कुटुंबप्रमुखाचेच लक्षण आहे.

ऑक्सिजन, लसीकरण यावर मुख्यमंत्री जातीने लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्र्यांनी उगीचच हिंडणे, फिरणे बंद केले. फालतू राजकारणाचे लॉकडाऊन करून संपूर्ण लक्ष कोरोना निवारण कामावरच केंद्रित केले. त्यामुळेच पंतप्रधान मोदींनाही महाराष्ट्राची पाठ थोपटण्याचा मोह आवरता आला नाही. दुसऱया महायुद्ध काळात महाराष्ट्राचे सुपुत्र डॉ. कोटणीस हे जीवाची पर्वा न करता चीनमध्ये आरोग्य सेवा करण्यासाठी गेले. त्या डॉ. कोटणीसांची परंपरा महाराष्ट्र आजही सांगतो. महाराष्ट्राला सेवेची आणि त्यागाची परंपरा आहे. कोरोनाची दुसरी लाट इतकी भयंकर झाली आहे की, अनेक बाधितांना बेडबरोबरच ऑक्सिजनसाठी झगडावे लागत आहे. हे वातावरण देशात असताना महाराष्ट्राने ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंसिद्ध होण्यात यश मिळविले आहे. काही काळापूर्वी राज्यातील स्थिती चिंताजनक होती. आता ती नियंत्रणात व आशादायक झाली आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंची पाठ थोपाटण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here