बिहारमध्ये गंगा नदीत कोरोनाग्रस्तांचे मृतदेह; चौकशीचे आदेश

बक्सर (बिहार) – कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या मृतदेहांची चक्क नद्यांमध्ये विल्हेवाट लावण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बक्सर येथे गंगा नदीत अनेक कोरोनाग्रस्तांचे मृतदेह आढळले आहेत. तर कटीहार येथेही कटीहार नदीत काही मृतदेह आढळले आहेत. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून स्थानिक प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

बक्सर जिल्ह्यातील चौसा येथील महादेव घाटावर अनेक मृतदेह तरंगतांना आढळले. चौसा येथील घाटावर दररोज १०० ते २०० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. मात्र, सरणासाठी लाकूड अपुरे पडते. त्यामुळे गंगा नदीतच मृतदेह फेकण्यात येतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

बिहारमध्येच दोन डझनांहून अधिक रुग्णवाहिका धूळ खात पडल्याचे उघडकीस आले होते. भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या खासदार निधीतून या रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here