पुणे जिल्ह्यात रेमेडिसिविरचा काळाबाजार; तिघांना अटक

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – कोरोना साथीच्या काळात रेमेडिसिवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आणखी एका टोळीच्या मुसक्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी आवळल्या आहेत. या टोळीकडून वाकड पोलिसांनी 21 रेमेडिसीवर इंजेक्शनसह आरोपींची वाहन आणि 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाकड पोलीस स्टेनशचे कर्मचारी नाकाबंदी करत असताना पोलिसांनी हे रेमेडिसीवर इंजेक्शन जप्त केले आहेत. कृष्णा रामराव पाटील, निखिल केशव नेहरकर आणि शशिकांत रघुनाथ पांचाळ अस रेमेडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीची नाव आहेत.

यातील कृष्णा पाटील हा थेरगाव येथील क्रिस्टल हॉस्पिटलमध्ये ब्रदर म्हणून कामाला आहे, तर निखिल नेहरकर हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असून शशिकांत पांचाळ याचा थेरगाव परिसरात आयुश्री मेडिकल आहे. शशिकांत पांचाळ याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या जवळील रेमेडिसीवर इंजेक्शन कृष्णा पाटील आणि निखिल नेहरकर यांना विक्रीस दिले होते, असे पोलीस तपासात उघडकीस आले आहेत. जप्त करण्यात आलेले रेमेडिसीवर इंजेक्शने हे क्रिस्टल हॉस्पिटलमधील गोदावरी मेडिकल आणि ओंनेक्स हॉस्पिटल मधील आयुश्री मेडिकलच्या नावाने अलॉट करण्यात आले होते.

मात्र आरोपी हे गरजू रुग्णांना रेमेडिसीवर इंजेक्शन देण्याऐवजी इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याच पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. पुणे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तक्रारी वरून वाकड पोलिसांनी तिन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून या तिन्ही आरोपींकडून 21 रेमेडिसीवर इंजेक्शन, एक कार, दोन दुचाकी आणि मोबाईल असा 10 लाख 60 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान मागील 15 दिवसात चार कारवाई करत बेकायदेशीर रित्या रेमडिसिव्हर विकणाऱ्या नऊ जणांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनेमुळे रेमडिसिव्हरची विक्री करणारे अनेक रॅकेट पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या पुढे असे प्रकार कुठे घडत असल्यास नागरीकांनी आपल्याला थेट कळवल्यास त्यानुसार कारवाई करत सबंधिता विरोधात आपण खंडणीचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here