पती मरणाच्या दारात असताना डॉक्टर – वॉर्डबॉय करत होते पत्नीची छेडछाड; पत्नीचा व्हिडीओ व्हायरल

sexual-harassment-of-corona-patients-wife-by-doctors-and-ward-boy

पाटणा (बिहार) – कोरोनाच्या या कठीण काळात लोकांना केवळ मानसिक, शारीरिक आणि आर्थिक बाजूंनी ग्रासलं नाही तर या काळात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटनाही पाहायला मिळाल्या. बिहारमधून अशीच एक घटना समोर आली आहे. पती मरणाच्या दारात असतांना डॉक्टर आणि वॉर्डबॉय पत्नीची छेडछाड करत होते. पत्नी रुचीने 26 दिवस आपल्या पतीसाठी रुग्णालयातील घाणेरड्या व्यवस्थेसोबत लढा दिला. मात्र, इतके प्रयत्न करुनही ती आपल्या पतीला वाचवू शकली नाही. पैशांसाठी तिचं शोषण झालं ते वेगळंच.

याबाबत आपली आपबिती सांगतांना रुचीने सांगितले की, या २६ दिवसांमध्ये मी जे काही सहन केलं ते अतिशय भयंकर होतं. माझ्या पतीच्या डोळ्यांमध्ये ऑक्सिजन संपण्याची भीती पाहिली. पाटणाच्या या खासगी रुग्णालयानं आपल्याकडे दाखल असणाऱ्या रुग्णांनाच काळाबाजार करत ऑक्सिजन विकला आणि मी पतीचा जीव वाचवण्यासाठी तो विकत घेतलाही. मात्र, मी नवऱ्याला वाचवू शकली नाही.

रुचीनं एका वृत्तवाहिनीशी बातचीत करताना डॉक्टर आणि परिचारिकांच्या हलगर्जीपणाबद्दलची माहिती दिली. तिनं असंही म्हटलं, की कोरोनातून एकवेळ माणूस वाचूही शकतो, मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा जीव जाणं निश्चित आहे. रुची आपल्या पतीसोबत होळीच्या निमित्तानं कुटुंबीयांना भेटण्यासाठी भागलपूरला गेली होती. ९ एप्रिलला तिच्या पतीला ताप आणि सर्दी झाली. उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुची आपल्या पतीची काळजी घेण्यासाठी त्याच्यासोबत रुग्णालयातच थांबत होती. याच काळात रुग्णालयातील कर्मचारी ज्योती कुमारनं तिच्यासोबत छेडछाड केली. उपचार घेत असलेल्या पतीनंही हे सर्व आपल्या डोळ्यांनी पाहिलं मात्र तो काहीच करू शकला नाही.

डॉक्टर व्यवस्थित काळजी घेत नसल्यानं तिनं आपल्या पतीला मायागंज रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिथे परिस्थिती आणखीच भयंकर होती. आयसीयुमध्ये एकापाठोपाठ एक रुग्णाचा मृत्यू होत होता मात्र कोणीच कोणाचं काही ऐकायला तयार नव्हतं. रुचीनं सांगितलं, की एक व्यक्ती डॉक्टर डॉक्टर ओरडत बेडवरुन खाली पडला. त्याच्या डोक्याला मार लागला आणि रक्त वाहू लागलं. मात्र, तरीही डॉक्टरांना काहीच फरक पडला नाही. डॉक्टर आणि नर्स आपल्या रुममध्ये लाईट ऑफ करुन चित्रपट पाहात बसतात मात्र कोणीच रुग्णांना पाहायला येत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

रुचीची मोठी बहिण ऋचा सिंहनं सांगितलं, की रुग्णालयात डॉक्टर आणि स्टाफ घाणेरड्या नजरेनं पाहायचे. इतकंच नाही तर वारंवार शरीराला हात लावण्याचा प्रयत्न करायचे. मायागंज रुग्णालयातही परिस्थिती गंभीर झाल्यानं रुग्णाला एअर अॅमबुलन्सनं दिल्लीला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती वेळेवर न आल्यानं पाटणामधीलच एका खासगी रुग्णालयात रुग्णाला भर्ती करण्यात आलं. आरोप आहे, की इथेही रुग्णांना लुटलं गेलं. इतकंच नाही तर रुग्णालयानं ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचं सांगत आपल्या रुग्णालयात दाखल रुग्णांना ५०-५० हजारात ऑक्सिजन सिलेंडर विकले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here