कोरोना बाधित पत्नीच्या मृत्यूमुळे नैराश्येतून सहा वर्षाच्या मुलीची हत्या करून पित्याची आत्महत्या

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – कोरोनाबाधित पत्नीच्या मृत्यूनंतर नैराश्येत गेलेल्या व्यक्तीने आपल्या सहा वर्षांच्या मुलीची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबई उपनगरातील विलेपार्ले गावठाण परिसरातून समोर आली आहे.

जितेंद्र गाडेकर (३६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जितेंद्र हा पत्नी, मुलगी, आई आणि भावासह चारकोप परिसरात वास्तव्यास होता. गेल्यावर्षी जून महिन्यात त्यांची पत्नी मानवी हिचे करोनाने निधन झाले. मुलगी लहान असल्याने जितेंद्र याने डिसेंबर महिन्यात दुसरे लग्न केले आणि नव्याने जीवन जगायचे ठरविले. विलेपार्ले गावठाण येथे असलेल्या घरात जितेंद्र आणि त्याच्या पत्नीने राहायला जाण्याचे ठरविले. त्यासाठी या घराला रंगरंगोटी करण्याचे काम सुरू होते. किती काम झाले हे पाहण्यासाठी रविवारी जितेंद्र सहा वर्षाच्या मुलीला घेऊन विलेपार्ले येथे गेला. सायंकाळी उशिरपर्यंत तो घरी न परतल्याने घरच्यांनी त्याच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तो कॉल उचलत नसल्याने विलेपार्ले येथील शेजाऱ्यांना याबाबत कळविले. शेजाऱ्यांनी दारं आतून बंद असल्याचे कळविताच जितेंद्रचे कुटुंबीय तातडीने विलेपार्ले येथे पोहचले. दरवाजा तोडला असता जितेंद्र आणि त्याची मुलगी गळफास लावलेल्या स्थितीत आढळले.

याबाबतची माहिती मिळताच सांताक्रूझ पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळी पोलिसांना जितेंद्र यांनी लिहिलेली चिठ्ठी आढळली आहे. त्यात पत्नीच्या मृत्यूनंतर नव्याने आयुष्यास सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य झाले नाही. मुलीला एकटे सोडणे शक्य नव्हते म्हणून सोबत घेऊन जात आहे. या कृतीसाठी कुटुंबाने माफ करावे आणि पत्नीचे झाले तेथेच अंत्यसंस्कार करावे, असे जितेंद्र याने चिठ्ठीत नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here