राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंवर भरदिवसा गोळीबार

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्यावर 3 राऊंड फायर करण्यात आले आहे. सुदैवाने अण्णा बनसोडे थोडक्यात बचावले आहे.

पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचं कार्यालय आहे. याच परिसरात दुपारी 1 वाजेच्या सुमारास तानाजी पवार नावाच्या इसमाने त्यांच्यावर हल्ला केला. तानाजी पवारने पिस्तुलीतून अण्णा बनसोडे यांच्यावर 3 राऊंड फायर केल्याची माहिती मिळत आहे. या गोळीबारातून अण्णा बनसोडे हे थोडक्यात बचावले. पोलिसांनी धाव घेऊन तानाजी पवार याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक पिस्तुल सुद्धा जप्त केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आमदारावरच गोळीबार झाल्याने तो शहरात चर्चेचा विषय ठरला. चिंचवड स्टेशन येथेच बनसोडे यांचे कार्य़ालय आहे. नगरसेवक असल्यापासून ते सकाळी लोकांना भेटत असल्याचा त्यांचा उपक्रम आहे. त्यांच्या कार्यालयाजवळच या गोळ्या झाडण्यात आल्या. एकूण चार गोळ्या झाडल्याचे समजते आहे. त्या कोणालाही लागलेल्या नाहीत. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. हा पवार स्थानिक नागरिकच असल्याचे समजते आहे. घटना घडल्यानंतर अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. याबाबत पवार व बनसोडे यांचे नक्की काय संबंध होते, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. बनसोडे यांचे अनेक व्यावसायिकांशी संबंध आहेत. ते पण पोलिस तपासून पाहत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here