सांगली (स्वप्नील कारेकर) – सांगलीत हॉटस्पॉट बनलेल्या इंदिरानगरात शनिवारी संतप्त नागरिकांनी कंटेन्मेंट झोनचे पत्रे उचकटून फेकले. रॅपिड अँटिजेन टेस्टलाही विरोध करीत संपूर्ण झोपडपट्टी रस्त्यावर उतरली. आरोग्य अधिकारी आणि कर्मचार्यांनाही त्यांनी तेथून हाकलून देण्याचा प्रयत्न केला. यातून प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
आयुक्त नितीन कापडनीस, पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर पोलिस पथकासह तिथे पोहोचले. अखेर परिसराचा कंटेन्मेंट झोन लहान केला. सोबतच नगरसेवक अभिजित भोसले, महेंद्र सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने सोमवारपर्यंत भागातील नागरिकांशी चर्चा करून तपासणीस तयार करण्याची हमी दिली. त्याचबरोबर नियमित स्वॅब (आर्टिपीसीआर टेस्ट) घेण्याचीही तयारी दर्शविली. त्यानंतर वादावर पडदा पडला.
येथील इंदिरानगरात दोन दिवसांपूर्वी कोरोनाच्या संशयावरून काहीजणांना स्वॅब घेऊन क्वारंटाईन करण्यात आले होते. त्या भागात शुक्रवारी दिवसभर रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आली. यामध्ये तब्बल 25 जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना अन्यत्र उपचारासाठी हलविले. तसेच उपायुक्त स्मृती पाटील, डॉ. रविंद्र ताटे यांच्यासह संपूर्ण यंत्रणेने तत्काळ परिसर पत्रे मारून बंदिस्त करीत कंटेनमेंट झोन केला. जंतूनाशकांची फवारणी केली. त्यावेळी भोसले, सावंत यांच्यासह कार्यकर्ते तेथे मदतकार्यासाठी राबत होते.
शनिवारी पुन्हा यंत्रणेने या भागात अँटिजन टेस्ट सुरू केली. त्यावेळी भागातील रहिवाशांनी त्या तपासणीस विरोध केला. पूर्वी नेलेल्यांचे अहवाल अजून आले नसताना कालच्या तत्काळ तपासणीत लोक पॉझिटिव्ह कसे आले? पूर्ण परिसर कंटेनमेंट झोन करून आम्ही जगायचे कसे? असे सवाल त्यांनी विचारले.
आरोग्य अधिकारी, कर्मचार्यांना त्यांनी धारेवर धरत लोकांनी विरोध सुरू केला. यातून जनक्षोभ उसळला आणि लोकांनी संपूर्ण परिसराचे पत्रे उचकटून फेकत कंटेनमेंटची उपाययोजनाच उधळून लावली.
हा प्रकार संबंधितांनी कापडनीस यांना सांगितला. त्यांनी तत्काळ पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, उपअधीक्षक वीरकर तसेच विश्रामबागचे निरीक्षक अनिल तनपुरे यांना कळविले. तत्काळ तेथे पोलिस फौजफाटा तैनात करीत लोकांना रोखण्यात आले.
अभिजित भोसले, महेंद्र सावंत, नितीन कापडनीस, अशोक वीरकर यांनी त्या भाागातील नागरिकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. भोसले, सावंत यांनी लोकांचीही भूमिका स्पष्ट केली.अखेर चर्चेने ज्या ठिकाणी रुग्ण सापडले त्या सहा गल्ल्या व परिसरात कंटेनमेंट झोन मर्यादित केला. हायरिस्क असलेल्या आजारी व्यक्ती आणि 50 वर्षांवरील व्यक्तींची सोमवारी कंटेनमेंट बाहेर आणून तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी दोन अॅम्ब्युलन्स घेऊन तेथे तपासणी केली जाईल, असे कापडनीस यांनी जाहीर केले. त्यामुळे वादावर पडदा पडला.
डॉ. रविंद्र ताटे, सावंता खरात, डॉ. शीतल धनवडे, स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले, सामाजिक कार्यकर्ते शेखर मोहिते, रंधवा गायकवाड, भारत चौगुले, छगन चौगुले, समशेर चौगुले, करण चौगुले, सुखदेव केंगार, संजय हदिमनी, जावेद मदारी, राहुल घाडगे उपस्थित होते.







