लोकलमध्ये मंत्रालय कर्मचाऱ्यावर महिलेसह चौघांचा हल्ला

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या मंत्रालय कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भरदिवसा सव्वा दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. चोरीच्या उद्देशाने महिलेसह चौघांनी प्रवाशावर हल्ला केला होता. यापैकी एकाला प्रवाशानेच धरुन ठेवले, तर इतर तिघे पसार झाले आहेत.

53 वर्षीय प्रवासी विजय वाघधरे यांच्यावर हा हल्ला झाला. वाघधरे हे मंत्रालयात एका विभागात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून काम करतात. ते नेहमीप्रमाणे सकाळी मंत्रालयात जाण्यासाठी निघाले. वाघधरे यांनी मध्य रेल्वेवरील करी रोड रेल्वे स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी धीमी लोकल पकडली होती.

लॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे ट्रेनमध्ये विशेष गर्दी नव्हती. त्याच डब्यात बसलेल्या एका प्रवाशाने वाघधरेंना आधी जवळ येऊन वेळ विचारली. त्यानंतर मश्जिद बंदर रेल्वे स्टेशन गेल्यानंतर चौघांनी वाघधरेंकडे पाकिट आणि गळ्यातील सोन्याची चेन मागितली. त्यांनी प्रतिकार करताच चौघांनी मारहाण सुरु केली.

वाघधरेंनी आरडाओरड सुरु केली. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या इतर लोकलमधील प्रवाशांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. परंतु त्यांनाही मदत करणं शक्य झालं नाही. अखेर लोकल स्टेशनला पोहोचली. त्यावेळी तिघा जणांनी धावत्या लोकलमधून उड्या टाकत पोबारा केला. परंतु वाघधरेंनी बहादूरी दाखवत एका चोराला पकडण्याची कामगिरीही बजावली. बुधवारी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत एका महिलेसह आणखी दोन आरोपींचा शोध सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांकडून घेतला जात आहे. तर आरोपी आसिफ शेख याला अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here