इन्कमटॅक्स व फूड ऑफिसर असल्याचे सांगून खंडणी मागणारा अटकेत

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – इन्कमटॅक्स ऑफिसर व फूड ऑफिसर असल्याचे सांगत खंडणी मागणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.राहुल किरण सराटे (वय-२७ वर्षे, रा. सिद्धार्थ कॉलनी, चेंबूर) असे अटक आरोपीचे नाव आहे.

हडपसर परिसरातील एका प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मालकास इन्कमटॅक्स ऑफिसर राजेंद्र कदम बोलतोय असे म्हणून आरोपीने अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन केला व तुमच्याविरुद्ध एका महिलेने कमी प्रतीचे सोने दिल्याबाबत तक्रार दिलेली असून, जर दुकान सील करायचे नसेल तर दिलेल्या अकाऊंटवर ३२,०००/- रु. जमा करण्याची मागणी केली. याबाबत फिर्यादी यांनी हडपसर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने वापरलेल्या मोबाईल फोनवरून गुन्ह्याचा तपास करीत असताना राहुल सराटे याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याचा शोध घेऊन त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे चौकशी करीत असताना त्याने फूड ऑफिसर व इन्कमटॅक्स ऑफिसर असल्याची बतावणी करून गुगल पे अकाऊंटद्वारे पैसे स्वीकारून अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच वेळप्रसंगी त्याने स्वतःच स्त्रीचा आवाज काढून जीएसटी ऑफिसर असल्याची बतावणी करूनही फसविलेले आहे.वरील आरोपीवर अंधेरी पोलीस स्टेशन व बंगलोर सिटी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच चेंबूर पोलीस स्टेशन, मुंबई, डीसीबी सीआयडी, लष्कर पोलीस स्टेशन या ठिकाणीही वरील आरोपीवर गुन्हे दाखल आहेत.

फूड ऑफिसर व इन्कमटॅक्स ऑफिसर असल्याची बतावणी करून आरोपी राहुल सराटे याने मुंबई, नवी मुंबई व कोल्हापूर परिसरातील इतर १० व्यावसायिकांचीही फसवणूक केलेली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, गुन्हे शाखेचे मा. अपर पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलाजी पांढरे, पोलीस उप निरीक्षक विजय झंजाड, पोलीस अंमलदार विनोद साळुंखे, सुरेंद्र जगदाळे, भूषण शेलार, अमोल पिलाने, प्रदीप शितोळे, चेतन शिरोळकर, प्रवीण पडवळ, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, राहुल उत्तरकर, विजय गुरव, संग्राम शिनगारे, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here