जेरुसलेम – इस्राईल आणि पॅलेस्टाईनमधील वाद गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा चिघळला आहे. गाझा पट्ट्यामध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर आता इस्राईलने तोफगोळेही डागण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना स्थलांतर करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही.
गाझामधील हमास संघटना आणि इस्राईल सरकार यामधील वाद पूर्वीपासून सुरू आहे. याआधी २०१४मध्ये दोन्हींमध्ये भीषण युद्ध झाले होते. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले प्रकार हे याच युद्धाची आठवण करुन देणारे आहेत. काही क्षेपणास्त्र तेल अवीव परिसरातदेखील कोसळल्यामुळे अरब आणि ज्यू लोकही आता रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात दंगली उसळत आहेत.
दुसरीकडे, इस्राईलने सोमवारपासून सुरू केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये गाझा पट्ट्यातील तीन मोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. यापूर्वी इस्रायली सैन्याने गोळीबार करत इमारतींमधील रहिवाशांना बाहेर पडण्याचा इशाराही दिला होता. गाझाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पॅलेस्टाईनमधील १००हून अधिक नागरिकांचा या हवाई हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला आहे. यांमध्ये २७ लहान मुले आणि ८ महिलांचा समावेश आहे. तर, सुमारे ५०० नागरिक जखमी झाले आहेत. इस्लामिक जिहाद संघटनेने सात दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले आहे. तर हमास संघटनेचे १३ दहशतवादी मारले गेले आहेत. यामध्ये एका वरिष्ठ कमांडरचाही समावेश आहे. इस्राईलच्या मते मारले गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या याहून अधिक आहे.
इस्राईमध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून, यांमध्ये एका सैनिकाचा आणि एका सहा वर्षीय मुलाचा समावेश आहे. जगभरातील नेत्यांनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गटेर्रेस यांनी दोन्हीकडून होत असलेल्या क्षेपणास्त्र वापराचा निषेध केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्राईलला पाठिंबा जाहीर केला आहे.
जेरुसलेममधील शेख जार्राह परिसरात गेल्या महिन्यापासून तणावाचे वातावरण आहे. इस्राईल सरकारने २८ पॅलेस्टिनी कुटुंबांचे विस्थापन करण्याचे जाहीर केल्यामुळे हा तणाव निर्माण झाला आहे. याठिकाणी दोन पॅलेस्टिनी नागरिकांनी इस्राईलच्या पोलीस अधिकाऱ्यांवर पेपर स्प्रेने हल्ला केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी इस्राईलच्या ओल्ड सिटीमध्ये शनिवारी रात्री झालेल्या दंगलीत सुमारे ८० पॅलेस्टिनी नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. पॅलेस्टिनी आंदोलकांनी सुरक्षा दलांवर काचेच्या बाटल्या आणि दगड फेकून मारले होते. त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर म्हणून स्टन ग्रेनेड आणि वॉटर कॅनन्सचा वापर केले होते.
इस्राईलने 11 मे रोजी गाझा पट्टीतील हनाडी टॉवर या इमारतीवर रॉकेट हल्ला केला होता. या हल्ल्यात २० जणांना आपले प्राण गमवावे लागले. यामध्ये नऊ लहान बालकांचादेखील समावेश होता. या इमारतीत हमास या कट्टरवादी संघटनेचे कार्यालय असल्याची माहिती आहे. याचाच सूड म्हणून हमास या संघटनेने इस्राईलच्या दिशेने १०० हून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. यामध्ये इस्राईलचे महत्त्वाचे शहर असलेल्या तेल अवीवचादेखील समावेश होता. येथूनच या संघर्षाला पुन्हा सुरूवात झाली.






