पुणे (पुणे उपसंपादक वासंती देवळे) – बाणेर परिसरातून एका व्यक्तीचे अपहरण करून १५ लाखांची खंडणी मागण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
१) मोहित हेमंत वेदपाठक (वय-३२, रा. गुलमोहर सोसा. खराडी, पुणे, मूळ गाव नांदेड) २) अक्षय दिलीप गिरीगोसावी (वय-२७, रा. येरवडा, पुणे) ३) मारुती नंदू पवार (वय-३४, रा. माले, ता. मुळशी, जि. पुणे) ४) नरहरी मोतीराम भालेकर (वय-३१, रा. वळणे सोनारवाडी, ता. मुळशी, जि. पुणे) अशी अपहरण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. याबाबत एका व्यक्तीने चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यक्तीला मोहित वेदपाठक व त्याच्या तीन साथीदारांनी दि. १० मे रोजी सकाळी बाणेर येथील क्रिस्टल एम्पायर येथील ऑफिसमध्ये मारहाण करून फिर्यादींच्याच आय-२० कारमध्ये फिर्यादींना जबरदस्तीने बसवून सुस रोड येथील ऑडी शोरूम ला नेले. त्यानंतर त्यांचे तोंड हात, पाय बांधून मुळशी येथील शेतामध्ये घेऊन जाऊन तेथे एका तंबूमध्ये फिर्यादींना बांधून ठेवले. फिर्यादींना मारहाण करून त्यांच्याजवळील मोबाईल, घड्याळ व एटीएम काढून घेतले. तसेच फिर्यादींना १५ लाख रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादींनी जेव्हा ते देण्याची तयारी दाखविली तेव्हा आरोपींनी त्यांना दि. १२ मे ला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पुन्हा सुस गावातील ऑडी शोरूम येथे सोडून दिले. त्यांनतर फिर्यादी यांनी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे वरील घटनेबाबत तक्रार दिली.
त्यानुसार पोलिसांच्या दोन टीम तयार करून आरोपींचा शोध घेण्यात आला असता वरील आरोपी हे मुळशी परिसरात असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांच्या दोन्ही टीमने छापा टाकला असता तीनही आरोपी त्या ठिकाणी मिळून आले. त्यांच्याकडे तपास करता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्यांच्याकडून फिर्यादींचा काढून घेतलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक संतोष कोळी करीत आहेत.
हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल झाल्यापासून ३६ तासांच्या आत उघडकीस आणण्यात आला आहे.सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पूर्व प्रादेशिक विभागाचे मा. अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ-४ चे मा. पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख व खडकी विभागाचे मा. सहा. पोलीस आयुक्त रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, सह. पोलीस निरीक्षक संतोष कोळी, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार सुधीर माने, प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे, श्रीकांत वाघवले, संतोष जाधव, भाऊराव वारे, प्रमोद शिंदे यांच्या पथकाने केली आहे.






