शिंदखेडा (प्रतिनिधी) : आज संपूर्ण जगात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. एका अदृष्य विषाणूशी संपूर्ण मानवजात लढा देत आहेत. यात अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. परंतु यात प्रकर्षाने एक बाब लक्षात आली ती म्हणजे प्रतिकारशक्ती…. ज्याची प्रतिकारशक्ती चांगली त्यांना या रोगावर नियंत्रण मिळवता आले.आजची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. आपल्यावर निसर्ग कोपला आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी वादळ, कधी गारपीट, कधी त्सुनामी या दुष्टचक्रात मानवजात सापडली असून पर्यावरणाचा समतोल राखणे हे संपूर्ण मानवजातीचे आद्य कर्तव्य झाले आहे.
आज पेट्रोल-डिझेलचा अमर्याद वापरामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान, शेतीसाठी रासायनिक खते व किटकनाशके यांचा वापरामुळे होणारे शेती व आरोग्याचे नुकसान, कारखानदारीमुळे जल, जमिन व वायुचे होणारे नुकसान यामुळे आपण सर्व संकटात असुन यावर उपाय म्हणून पेट्रोल-डिझेलचा वापर बंद करुन स्वच्छ इंधनाकडे येणे व रासायनिक शेती बंद करुन सेंद्रीय शेतीकडे वळणे याशिवाय पर्याय नाही. म्हणून शिंदखेडा तालुक्यात अक्षयतृतीया व रमजान ईदच्या पवित्र मुहूर्तावर कचऱ्यापासून बायोसीएनजी व खत निर्मितीचा प्रकल्पाचे भुमिपूजन आज कोविड-19 ची परिस्थिती असल्याने घरगुती वातावरणात फेसबुक लाईव्ह व झुम ॲपद्वारे सिंधुदेवी क्लिनफ्युएल्सचे चेअरमन श्री. हेमंत साळुंके, व्हा.चेअरमन श्री. पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक श्री. सिध्दांत साळुंके, संचालक लक्ष्मीकांत साळुंके, योगेश पाटील, जितेंद्र सूर्यवंशी तसेच MCL चे BDA योगेश पवार, महेश माळी, सर्व MVP प्रोजेक्ट धारक, श्री.आधार पाटील, श्री.विश्वनाथ पाटील, श्री. सर्जेराव पाटील, श्री.वसंत पाटील, कृषी अधिकारी श्री.पिंपळे, डॉ.मनोज पाटील व शेतकरीबंधु यांचे उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी माहिती देतांना श्री.हेमंत साळुंके यांनी फेसबुक लाईव्हद्वारे सांगितले की, हा प्रकल्प मुंबईस्थित MCL व SDCL व SPCL या कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने होत असून या प्रकल्पात बायोसीएनजीसह द्रवरुप व घनरुप खते, एल.डी.ओ व एफ.ओ चे उत्पादन घेण्यात येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प प्रदुषण मुक्त असुन या प्रकल्पामुळे पर्यावरण, रोजगार, आरोग्य, शेती व शेतकरी, ग्राम स्वच्छता देखील होणार आहे.
या प्रकल्पासाठी कच्चा माल म्हणून गावातील कचरा उदा. शेळी, मेंढी, गाय, बैल, म्हशीचे शेण, घरातील वाया जाणारे अन्न, प्लास्टीक, रबर, तुटलेल्या चपला, कपडे तसेच शेतातील वाया जाणारे कपाशीच्या काड्या, कळीचे-पपईचे खांब, निंदणीतुन निघालेले तण, धसकटे, मक्कीचे भुणकेसह झाडाच्या तुटलेल्या फांद्या, काटेरी झुडपे, जे जळते ते सर्व ही कंपनी हमी भावाने खरेदी करणार आहे. शिवाय शेतकऱ्यांना नेपियर गवताची करारशेती करुन गवत हमी भावाने खरेदी करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. शिवाय सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून विषमुक्त अन्न मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे आपला शिंदखेडा तालुका इंधनात आत्मनिर्भर होणार असून रोजगार निर्मिती, ग्राम स्वच्छता, शेतकऱ्यांचा आर्थिक विकास, सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून आरोग्याचे रक्षण व पर्यावरणाचे देखील रक्षण होणार आहे म्हणून हा प्रकल्प शिंदखेडा तालुक्यात इतिहास घडविणार असून यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री. हेमंत साळुंके यांनी केले आहे. श्री. हेमंत साळुंके यांनी केले आहे.






