कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – मृत्युशय्येवरील रुग्णांना जीवनदायी मात्रादेण्याऐवजी रेमडेसिवीरची परस्पर विक्री करणार्या रॅकेटचे कारनामे उघड होण्याची शक्यता आहे. राजारामपुरी पोलिसांनी उद्यमनगर परिसरातील हॉस्पिटलची तपासणी करून एका परिचारिकेला अटक केली. मनीषा तानाजी रोटे (वय 30, रा. रोटे गल्ली, कागल) असे तिचे नाव आहे.
पोलिसांच्या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. रुग्णांना इंजेक्शनची मात्रा दिल्याचे भासवून काळ्या बाजारात विक्री करणार्या रॅकेटमध्ये आणखी एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरसह तिघांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यापैकी एकजण कोरोनाबाधित आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. डिस्चार्ज मिळताच संबंधिताला अटक केली जाईल, असे पोलिस निरीक्षक सीताराम डुबल, भगवान शिंदे यांनी सांगितले.
रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. ऑक्सिजन पातळी खालावली आहे. रेमडेसिवीरची तत्काळ गरज आहे, असे सांगून इंजेक्शन घेऊन येण्यास नातेवाईकांना भाग पाडले जात होते. एखाद्या इंजेक्शनची मात्रा देऊन उर्वरित रेमडेसिवीर चढ्या भावाने विक्री करण्यात आल्याचा प्रकारही उघडकीला आल्याचे डुबल यांनी सांगितले.
रेमडेसिवीरचा काळा बाजार करणार्या टोळीचा छडा लावत ‘एलसीबी’ने इस्लामपूर येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर प्रणव राजेंद्र खैरे (रा. मराठा बोर्डिंग), सचिन दौलत जोगम (सानेगुरुजी वसाहत, मूळ धामोड, ता. राधानगरी) व प्रकाश लक्ष्मण गोते (राजोपाध्येनगर) यांना यापूर्वीच अटक केली होती.
संशयित गोते व परिचारिका मनीषा रोटे उद्यमनगर येथील हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत. शिवाय, कोव्हिड सेंटरची जबाबदारी रोटे हिच्यावर सोपविण्यात आली होती. रुग्णांसाठी मागविण्यात आलेले इंजेक्शन रुग्णांना न देता गोतेच्या मध्यस्थीने जादा दराने विक्री केल्याचा प्रकार उघडकीला आल्याने पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.
टोळीतील अन्य संशयित प्रशिक्षणार्थी डॉ. प्रणव खैरे उद्यमनगर येथील दुसर्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करीत होता. शिवाय, औषध दुकानातही कार्यरत होता. साथीदार सचिन जोगमही औषधाच्या दुकानात कामाला होता. संबंधित हॉस्पिटलमध्ये दोन बाधित महिलांवर उपचार सुरू होते. महिलांसाठी नातेवाईकांकडून प्रत्येकी 6 रेमडेसिवीर मागविण्यात आले. त्यापैकी त्यांना पाच-पाच इंजेक्शन देण्यात आली. उर्वरित दोन इंजेक्शन जोगमच्या मध्यस्थीने विक्रीचा प्रयत्न झाला. खैरे, जोगम यांना अटक करण्यात आली आहे, असेही डुबल यांनी सांगितले.
रेमडेसिवीर काळा बाजारप्रकरणी चौकशीची व्याप्ती वाढत आहे. रॅकेटमध्ये आणखी एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरसह तिघांची नावे पुढे आली आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यापैकी एक संशयित कोरोनाबाधित असल्याचे सांगण्यात आले. डिस्चार्जनंतर त्याला अटक करण्यात येईल, असे तपासाधिकार्यांनी सांगितले.






