पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – महानगरपालिकेत नोकरीच्या आमिषाने तरूणींची आर्थिक फसवणूक करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. विद्या दीपक साळवे (नेमणूक हडपसर पोलिस ठाणे) असे त्यांचे नाव आहे. पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. संबंधित महिला कर्मचाऱ्याविरूद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात लिपीक पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने विद्या साळवे यांनी तीन तरूणींकडून प्रत्येकी अडीच लाख मिळून साडेसात लाख रुपये घेतले होते. पैसे देउनही नोकरी मिळत नाही असे लक्षात आल्यानंतर तरूणींनी विद्या साळवे यांच्याकडे पैसे मागणीसाठी तगादा लावला होता. त्यानुसार त्यांनी 3 लाख रुपये तरूणीला परत केले होते. मात्र राहिलेले साडेचार लाख रुपये त्यांनी परत देण्यास टाळाटाळ करत होत्या.
याप्रकरणी तरूणींनी खडकी पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दिली होती. कर्मचारी विद्या साळवे यांचे वर्तन पोलिस खात्याच्या शिस्तीस धरूण नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. आर्थिक लाभापोटी पोलिस अंमलदार पदाचा गैरवार केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीत त्यांनी दररोज राखीव पोलिस निरीक्षक मुख्यालय येथे हजेरी लावने बंधनकारक करण्यात आले आहे.






