भिवंडीत बारा हजार जिलेटीन कांड्या जप्त; गुन्हे शाखेचे कारवाई

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीनस्फोटकांच्या कांड्या सापडल्या नंतर जेलिटीन स्फोटजकांच्या अवैध साठ्यांवर ठिकठिकाणी धाडसत्र सुरु झाली. सोमवारी भिवंडीतील कारीवली गावच्या हद्दीत असलेल्या खदानीच्या बाजूला असलेल्या कार्यालयात जिलेटिनच्या अवैध साठ्यावर ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी धाड टाकून याठिकाणाहून तब्बल १२ हजार जिलेटीन च्या कांड्या जप्त करण्यात आल्या असून एका वर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

गुरुनाथ काशिनाथ म्हात्रे ( वय ५३ रा. कालवार ) असे अवैध जिलेटीन साठा साठविल्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याने आपल्या कारीवली येथील महेश स्टोन चाळीत असलेल्या कार्यालयाच्या स्टोअर रूममध्ये मानवी जिवीतास धोका निर्माण होईल हे माहित असतानाही सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे २५ किलो वजनाचे एकुण ६० बॉक्स त्यात एकुण ११,४०० जिलेटिन स्फोटक पदार्थाच्या कांडया ज्यांचे एकूण वजन १,५०० किलो असून डेक्कन पॉवर कंपनीचे ०३ बॉक्स त्या प्रत्येक बॉक्समध्ये २०० जिलेटिन स्फोटक पदार्थाच्या कांडया अशा एकुण ६०० जिलेटिन स्फोटक पदार्थाच्या कांडया ज्यांचे एकुण वजन ७५ किलो अशा एकुण १२ हजार जिलेटिन स्फोटक पदार्थाच्या कांडया व सोलर कंपनीचे २५०८ इलेक्ट्रीक डेटोनेटर व डेक्कन कंपनीचे ५०० इलेक्ट्रीक डेटोनेटर असे एकुण ३००८ इलेक्ट्रीक डेटोनेटर असा मोठया प्रमाणात जिलेटीन व इलेक्ट्रीक डेटोनेटर असा एकुण २ लाख ७ हजार रुपये किंमतीचा स्फोटक पदार्थांचा साठा विना परवाना व बेकायदेशीरित्या साठविला असल्याचे आढळून आले.

या अवैध जिलेटीन साठ्याबाबत ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एक च्या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी याठिकाणी छापा टाकून अवैध जिलेटीन साठा जप्त केला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणे गुन्हे युनिट एकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल जाधव करीत आहेत. तर घटनास्थळी ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्यासह भिवंडीचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस ए इंदलकर, तसेच भिवंडी व ठाणे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेट दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here