नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव)
दि १७ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात बहुचर्चित आणि राजकीय सहकार क्षेत्रात अग्रस्थानी, मोठी परंपरा असणाऱ्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम गेल्या अनेक दिवसांपासून वाजत आहेत, ही निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे पण……..!
राज्यात गेल्या दोन तीन महिन्यापासून कोरोनाच्या महामारी चा दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरू आहे.केंद्र सरकार काय, अगर राज्य सरकार काय कोरोनाच्या बाबतीत दोन्हीनी या अगोदर केलेल्या धोरणात्मक चुका, दूरदृष्टीचा अभाव,बेफिकिरी, अतिआत्मविश्वास, आणि जगात काय चाललंय ? आपण काय करतोय ? यासर्व अनागोंदी ने आणि भोंगळ नियोजन, कारभार याचा परिपाक म्हणून आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र महामारीच्या कचाट्यात सापडला आहे. बाधितांचे लाखोंचे आकडे आणि मृत्यूचे तांडव बघून अक्षरशः थरकाप उडत आहे.सबंध देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली आहे,संपूर्ण आरोग्य व्यवस्था आणि प्रशासन वर याचा प्रचंड जीवघेणा ताण निर्माण झाला आहे. अशा वातावरणात सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कार्यक्षेत्र असणाऱ्या, ४०/५० हजार सभासद संख्या असणाऱ्या कृष्णा सारख्या मोठ्या कारखान्याच्या निवडणुकीचा घाट घातला जात असेल तर,आम्ही अजूनही जगाच्या तुलनेत कुठे आहोत ? आणि मागच्या चुकावरून काही धडा शिकणार आहोतकी नाही ?असा संतापजनक प्रश्न निर्माण झाला आहे.
एक तर पहिली लाट ओसरल्यावर जणू काही कोरोना संपला अशा अविर्भावात आमचे केंद्रीय नेतृत्व जगापुढे कोरोनविरुद्धचा लढा आम्ही जिंकला अशा फुशारक्या मारून बढाया मारू लागले, त्यांचीच री बहुतांशी राज्यांनी ओढली आणि आम्ही सर्व व्यवहार, कार्यक्रम,उद्योग, शाळा, वाहतूक, लग्नसोहळा, निवडणुका सर्व पूर्ववत तातडीने एकदमच सुरू केले, याचा व्हायचा तोच भयानक परिणाम झाला, शास्त्रज्ञ,वैद्यकीय संघटना, संस्था,डॉक्टर, सल्लागार यांनी दुसऱ्या लाटेचा इशारा देऊनही आम्ही गंभीर पणे विचार केला नाही परिणाम ? संपूर्ण देशात कोरोनाचे भयंकर तांडव नृत्य सुरू आहे.
दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जगातील बहुतेक देशांनी लसीकरण हे टार्गेट पुढे ठेवून त्यावर युद्धपातळीवर काम सुरू ठेवले आहे, आमच्या सरकारने मात्र विश्वगुरु होण्याच्या मूर्ख पणातून उत्पादीत लसींचा साठा इतर देशांना खिरापत म्हणून वाटून टाकला,आणि आज देशातील लोकांना लसीसाठी अक्षरशः भीक मागण्याची वेळ या सरकारने आणून ठेवली आहे. कोरोनाचा कहर सुरू झाला असताना या सरकारने कुंभमेळे ५ राज्यातील निवडणूक याना प्राधान्य देऊन सबंध देश अक्षरशः मृत्यूच्या खाईत लोटून देण्याचे महापातक केले,*ऑक्सिजन बेड व्हेंटिलेटर औषध यांच्या तुटवड्यामुळे हजारो माणसे उपचाराअभावी हकनाक मेली न्हवे सरकारने मारली ? असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
राज्यात ही हिच अवस्था झाली, दुसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन कुठलीही पूर्वतयारी न करता राज्य सरकारने ग्रामपंचायत निवडणुका, सहकारी संस्था निवडणुका यांना प्राधान्य दिले, सर्व प्रकारची बंधने अंशतः टप्या टप्प्याने कमी करण्या ऐवजी सर्व एकदमच खुले करण्यात आले त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला लोकडाऊन ला वैतागलेली लोकं मग चौखूर उधळली.
मग निवडणुका काय ? अन लग्नसमारंभ काय ? अन इतर कार्यक्रम काय ? या सर्व अनिर्बंध वागण्याने दुसऱ्या लाटेच्या आगीत तेलच ओतलं गेलं,परिणामी महाराष्ट्र देशातील कोरोना हॉटस्पॉट ठरलाय.आरोग्य यंत्रणा या प्रकोपात हतबल ठरली आहे. कडक लॉक डाऊन असूनही कोरोनाचा कहर आटोक्यात येत नाही,हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत,पुरेशा सुविधा अभावी बहुतांश लोक हकनाक मरत आहेत. याला जबाबदार कोण ? अशा सर्व भयानक परिस्थितीत ही राज्यात एका मतदारसंघात विधानसभा पोटनिवडणुक अन एका सहकारी दूध संघाची निवडणूक उरकून सरकारने आपले घोडे राजकीय गंगेत न्हाऊ घालण्याचा हीन संतापजनक, असंवेदनशील प्रकार करून कोरोनाच्या कराल जबड्यात शेकडो, हजारो निष्पाप लोकांना लोटून देण्याचे दुष्कृत्य केले नाही काय ? अशी सर्व भयानक वस्तुस्थिती असताना जर कृष्णाच्या निवडणुकीचा फड उभा राहिला तर हॉटस्पॉट सातारा आणि सांगली जिल्ह्यात किती बिकट, भयानक परिस्थिती निर्माण होईल हे सांगण्यासाठी कुठल्याही कुडमुडा जोतिषाची गरज नाही.
इटलीतील रोम शहर जळत असताना सम्राट निरो फिडल वाजवत होता असे इतिहास सांगतो मग विद्यमान राज्यकर्ते आणि सरकारला गोरगरिब महामरीत किडा मुंगीसारखे मरून त्यांच्या चिता राज्यात धडधडत असताना काय फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करायची आहे काय ?
कराड तालुका अगोदरच हॉटस्पॉट आहे,त्यातच कारखाना निवडणूक म्हटल्यावर प्रचारसभा, मेळावे,जेवणावळी मीटिंग,भेटीगाठी या प्रकाराना कोणीही रोखू शकणार नाही,या गदारोळात कोरोना संसर्गाला पोषक वातावरण निर्माण होऊन मोठे अराजक माजेल.याचा सामना करण्यासाठी आपली यंत्रणा सक्षम आहे काय ? तिच्यात शक्ती राहिली आहे काय ? यामुळे शेकडो हजारो शेतकरी कुटुंबे संक्रमित होण्याचा धोका निर्माण होणार नाही का ? नेतेमंडळी याना संक्रमण झाले तरी त्यांना व्ही आय पी ट्रिटमेंट अंतर्गत मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरातील अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये हलवून ताबडतोब उपचार मिळणार,मात्र गोरगरीब, सामान्यशेतकरी यांचे काय ? त्यांनी बेड ऑक्सिजन अभावी औषधा अभावी मरायचे काय ? या प्रश्नांची समाधान कारक उत्तरे सरकार व राजकीय नेत्याजवळ असतील तर खुशाल निवडणुका घ्या ! आणि नसतील तर सुजलाम सुफलाम कृष्णा, कोयना काठाचा गंगाघाट करण्याचा अट्टाहास मूर्खपणा करू नका ! अन्यथा काळ तुम्हाला माफ करणार नाही.






