मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – तौत्के चक्रीवादळात ताशी 100 ते 114 किमी वेगाने वाहणार्या वार्यामुळे मुंबई शहरात तब्बल 2 हजार 414 झाडे कोसळली. यात 25 ते 40 वयोगटातील झाडांची संख्या मोठी आहे. सर्वाधिक 1 हजार 110 झाडे पूर्व उपनगरात उन्मळून पडली.-cyclone
रहदारीच्या रस्त्यांसह बाजारपेठा, गृहनिर्माण सोसायट्या, उद्याने अशा सर्वच ठिकाणी वड, पिंपळ, आंबा, अशोक, पेरू आदी झाडे कोसळली. भायखळासह आर. एन. नारकर मार्ग पंतनगर घाटकोपर, व अन्य शंभर ठिकाणी कोसळलेली झाडे तुलनेने महाकाय होती. ही झाडे हटवण्यास अग्निशमन दल व उद्यान खात्याला पाच ते सहा तास लागले. त्यामुळे मंगळवारी दिवसभर ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत राहिली. पावसाळ्यात मुंबईत झाडे उन्मळून पडण्याच्या घटना वाढतात. ही संख्या दररोज सरासरी 100 ते 120 इतके असते. या चक्रीवादळात हजारो झाडे पडली. एवढ्या मोठ्या प्रमाणात एका दिवशी झाडे पडण्याची ही पहिलीच घटना असल्याचे उद्यान खात्याकडून सांगण्यात आले.
शहर विभागात 688, पश्चिम उपनगरात 516, तर पूर्व उपनगरात 1 हजार 110 झाडे पडली. वरळी बीडीडी चाळ येते वडाचे झाड पडून जखमी झालेल्या संगीता खरात या 45 वर्षाच्या महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.






