शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी
शिंदखेडा (प्रतिनिधी) – दि. 1 मे 2021 पासून किमान आधारभूत किंमतीवर भरडधान्य खरेदी होणार होती ती आजतागायत सुरु झालेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड आर्थिक संकटात सापडला असून लवकरच खरीप हंगामाला देखील सुरुवात होणार आहे. त्यासाठी किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य मका, ज्वारी व गहू खरेदी सुरु करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दिलेल्या पत्रात नमुद केले आहे की, धुळे जिल्ह्यात किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य खरेदी करीता शासनाने शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासंदर्भात कळविले होते. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील 4 हजार 643 शेतकऱ्यांनी मका, ज्वारी व गव्हाची नोंदणी केलेली आहे. परंतु दिनांक 1 मे 2021 पासुन किमान आधारभुत किंमतीवर खरेदी सुरु होणार होती. आजतागायत शासनाकडून खरेदी सुरु झालेली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी धुळे जिल्हा शिवसेनेकडे प्राप्त झालेल्या आहेत. सद्यपरिस्थितीत कोरोना महामारीमुळे शेतकरी वर्ग प्रचंड आर्थिक संकटात असुन लवकरच खरीप हंगामाला देखील सुरुवात होणार आहे. अगोदरच कोरोनामुळे शेतकरी संकटात असतांना खरीप हंगामात पैसा कुठून उभा करावा या चणचणीत शेतकरी वर्ग अडकला आहे.
मागील वर्षी पावसाळा चांगला असल्याने मका, ज्वारी व गव्हाचे विक्रमी उत्पादन धुळे जिल्ह्यात झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांकडे किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेमुळे मका, ज्वारी व गहु घरात पडून आहे. शिंदखेडा तालुक्यात तापी काठावर मोठ्या प्रमाणात ज्वारीचे (दादर) उत्पादन घेतले जाते. बाजारात ज्वारीचे भाव पंधराशे रुपये प्रती क्विंटल असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय मका पिकाची सुध्दा तीच अवस्था आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक संकटातुन काढण्यासाठी व येणाऱ्या पावसाळ्यात पिकांचे योग्य प्रकारे नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देऊन किमान आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत मका, ज्वारी व गव्हाची लवकरांत लवकर खरेदी सुरु करावी असेही पत्राच्या शेवटी नमुद केले आहे.






