ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – विद्यामंदिर मार्ग परिसरातील एका इंग्लिश कॉन्व्हेंट स्कुलला बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.सुदैवाने या आगीच्या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र या दुर्घटनेवेळी शाळेत तिसऱ्या मजल्यावर आगी प्रसंगी अडकून बसलेल्या 2 शिक्षकांची वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने सुखरुप सुटका केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसईतील नवघर माणिकपूर शहरातील एच प्रभागात विद्यामंदिर मार्ग शेजारी सेंट एन्स कॉन्व्हेंट स्कुलची मोठी इमारत आहे. शाळा बंद असलेल्या या इमारतीत त्यावेळी शालेय कामकाजासाठी दोन शिक्षिका तेथील तिसरा मजल्यावर काम करीत होत्या.
दरम्यान अचानकपणे या इमारतीत सकाळी 11 वाजता स्कुलच्या तळमजल्यावरील स्टोर रूम मध्ये आगीने पेट घेतला असल्याचे बाजुला असलेल्या काही रहिवासी संकुलातील नागरिकांनीं पाहताच त्यांनी तात्काळ वसईच्या सनसिटी दिवाणमान अग्निशमन दलाला कळविले. तात्काळ त्याठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत शर्तीचे प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणली. मात्र, त्याचवेळी येथील तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या दोन शिक्षिकाना देखील सुखरूप खाली आणण्यात यशस्वी ही झाले. आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही.






