सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आता बोगस डाॅक्टरांच्या घटनाही घडत आहेत. नारायणवाडी (ता.कराड) येथे एका महिला बोगस डाॅक्टरला आज पोलिसांनी कोरोना रुग्णांवर उपचार करताना रंगेहाथ पकडले आहे. कराड पोलिसांनी सदर बोगस महिला डाॅक्टरला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नारायणवाडी (ता.कराड) येथे एक महिला डाॅक्टर पंत क्लिनिक नावाने एक दवाखाना चालवत होती. कालेगण भागात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच कोरोना मृत्यूदरही वाढत आहे. यापैकी अनेक रुग्णांनी पंत क्लिनिक येथे उपचार घेतल्याची माहिती काले प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यादव यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी सदर क्लिनिकला भेट दिली, पण अनेकदा हे क्लिनिक बंद असल्याने यादव यांना शंका आली. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.
आज बुधवारी दुपारी 3च्या सुमारास पंत क्लिनिक येथे एक महिला डाॅक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर सापळा रचून पोलिसांनी पंत क्लिनिकवर छापा घातला असता सदर महिला डाॅक्टर बोगस असल्याचे उघड झाले.






