केरळच्या इतिहासात प्रथमच एक महिला पत्रकार मंत्री बनणार

केरळ – केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी सोमवारी (17मे) आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या मंत्रिमंडळ विस्तारात एक इतिहास घडला आहे. केरळच्या इतिहासात प्रथमच एक महिला पत्रकार मंत्री बनणार आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यासदस्या वीणा जॉर्ज आता केरळच्या मंत्री बनल्या आहेत. गुरुवारी (20मे) मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्यासह नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. सहा एप्रिल रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ एलडीएफने 140 पैकी 99 जागांवर विजय मिळवून सत्ता राखली आहे. पुन्हा सत्तेत आलेले विजयन काय नवे निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. ‘वन इंडिया’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

वीणा जॉर्ज यांनी मल्याळम भाषेतल्या अनेक चॅनेल्सवर पत्रकार आणि न्यूज अँकर म्हणून काम केलं आहे. पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2016च्या विधानसभा निवडणुकीत अरनमुला मतदारसंघातून उभ्या राहिलेल्या वीणा यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी शिवदासन नायर यांना 7646 मतांनी हरवलं होतं. नायर हे काँग्रेसचे नेते. त्यांची हार झाल्यामुळे वीणा यांनी तो मतदारसंघ काँग्रेसकडून आपल्याकडे खेचून घेतला. वीणा जॉर्ज यांच्या राजकीय कारकिर्दीची ती सुरुवात होती. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत पठान मथिट्टा जिल्ह्याच्या मतदारसंघातून वीणा यांनी तब्बल 19 हजार मतांधिक्याने विजय प्राप्त केला.

45 वर्षांच्या वीणा जॉर्ज यांना दोन मुलं आहेत. त्यांनी भौतिक विज्ञानात एमएस्सीचं शिक्षण घेतलं असून, बीएडमध्ये त्या वरचा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. सध्या त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पठान मथिट्टा क्षेत्र समितीच्या सदस्या आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची विद्यार्थी शाखा असलेल्या स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI)या संघटनेच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली होती. वीणा जॉर्ज यांचे पती डॉ. जॉर्ज जोसेफ हे एक उच्च माध्यमिक शिक्षक असून, मलंकारा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्चचे सचिव म्हणूनही त्यांनी कार्य केलं आहे.

वीणा जॉर्ज यांच्या व्यतिरिक्त पिनरई विजयन यांच्या मंत्रिमंडळात आणखी दोन महिलाही असतील. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यवाहक सचिव ए.विजय राघवन यांच्या पत्नी प्रा. आर. बिंदू यांची पक्षाने मंत्रिमंडळात निवड केली आहे. तसंच, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI)चादयमंगलम मतदारसंघातून निवडून आलेल्या आपल्या ज्येष्ठ नेत्या जे. चिंचूरानी यांचं मंत्रिमंडळात निवडीसाठी नामनिर्देशन केलं आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मंत्री म्हणून एखाद्या महिलेला संधी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here