इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यात अखेर युद्धबंदी

इस्त्रायल – तब्बल 11 दिवसांच्या हिंसक संघर्षानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात अखेर युद्धबंदी झाली आहे.शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी दोन वाजता (भारतीय वेळेनुसार पहाटे साडेचार वाजता) युद्धबंदी लागू झाली. गेले 11 दिवस हा संघर्ष पेटत होता. विशेषतः गाझापट्टीत. यात 240 हून अधिक जणांचा मृत्यू झाला.

इस्रायलच्या मंत्रिमंडळाने काही तासांपूर्वीच ‘परस्पर आणि बिनशर्त’ युद्धबंदी मंजूर करण्याच्या निर्णयाची पुष्टी केली.हमासच्या एका अधिकाऱ्याने शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजल्यापासून ‘परस्पर आणि एकाचवेळी’ युद्धबंदी लागू होणार असल्याचं स्पष्ट केलंय.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनीही आपल्याला हीच वेळ सांगितली होती, असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी नंतर सांगितलं.युद्धबंदीमुळे विकासासाठीची ‘खरी संधी’ मिळाल्याचं बायडन यांनी म्हटलं.गुरुवारी इस्रायलने गाझापट्टीच्या उत्तरेकडच्या हमासच्या अनेक ठिकाणांवर शंभराहून अधिक हवाई हल्ले केले. हमासनेही रॉकेट हल्ले करत प्रत्युत्तर दिलं.

पूर्व जेरुसलेम शहरात इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून तणाव होता. त्याचं पर्यवसान दोघांसाठीही पवित्र मानल्या जाणाऱ्या स्थळाजवळ झालेल्या चकमकीत झालं.7 मे रोजी अल-अक्सा मशिदीजवळ ज्यू आणि अरब यांच्यात चकमक झाली. त्यानंतर दोनच दिवसात 10 मे पासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली. इस्रायलने पवित्र ठिकाणावरून माघारी जावं, असं आवाहन करत हमासने रॉकेट हल्ल्याला सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल इस्रायलने मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले.

हमासच्या नियंत्रणात असलेल्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या हिंसक संघर्षात गाझापट्टीत आतापर्यंत कमीत कमी 232 जणांचा मृत्यू झाला. यात 100 महिला आणि मुलांचाही समावेश आहे.तर गाझापट्टीत ठार झालेल्यांमध्ये कमीत कमी 150 हमासचे अतिरेकी असल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे. मात्र, हमासचे किती लोक ठार झाले, याची अधिकृत आकडेवारी हमासने दिलेली नाही.इस्रायलमध्ये हमासच्या रॉकेटहल्ल्यात 2 लहान मुलांसह एकूण 12 जणांचा मृत्यू झाल्याचं इस्रायलच्या वैद्यकीय सर्व्हिसकडून सांगण्यात आलंय.

गाझापट्टीतून हमासच्या लोकांनी इस्रायलवर 4000 रॉकेट्स डागल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे. यातले 500 हून अधिक रॉकेट्स गाझापट्टीतच कोसळले तर इस्रायलमध्ये आलेल्या रॉकेट्सपैकी 90% रॉकेट्स क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेने पाडल्याचं इस्रायलने सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here