जालन्यात लाच घेताना डीवायएसपीसह तीन पोलीसांना अटक

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – कोरोना काळात जीव ओतून काम करणाऱ्या पोलिसांच्या कार्याच्या सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र या कार्यावर पाणी फेरण्याचे काम करणारेही काही पोलिस असल्याचे जालना येथे सिध्द झाले आहे. जालन्यात लाचखोर पोलिसांना रंगेहात पकडण्यात आलं आहे.

जालन्यामध्ये लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात हे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अडकले आहेत. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस उपअधिक्षकांसह आणखी दोन जणांना रंगेहात पकडलं आहे. अ‍ॅट्रोसिटीच्या एका प्रकरणात मदत करण्यासाठी 5 लाखांची लाच या सर्वांनी मागितली होती. त्यापैकी काही रक्कम स्वीकारलाचा त्यांना पकडण्यात आलं आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस नाईक संतोष अंभोरे आणि पोलीस शिपाई विठलं खार्डे असं अटक केलेल्या लाचखोर पोलिसांची नावं आहेत. अ‍ॅट्रोसिटी प्रकरणात मदत करण्यासाठी या सर्वांनी 5 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोड करून 3 लाख रुपयांवर बोलणी ठरली. त्यानंतर गुरुवारी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात 2 लाख रुपयांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून तिघांना अटक केली.

पोलिस कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारीदेखिल लाचेच्या प्रकरणात अडकल्यामुळे जालना पोलीस दलामध्ये एकच खळबळ माजली आहे. समाजामध्ये नागरिकांचं रक्षण करण्याचं काम पोलीस करत असतात. बहुतेक सर्व पोलीस कर्मचारी प्रामाणिकपणे त्यांचं काम करतात. पण अशा काही लाचखोरांमुळे अनेकदा प्रामाणिक पोलिसांनाही लोक संशयाच्या नजरेनं पाहतात. त्यामुळे अशा लाचखोर अधिकारी पोलिसांना असाच धडा शिकवणं गरजेचं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here