कुछ दिन और सही… बहोत बडा धमाका होगा..; बर्थ पोस्टमुळे पिंपरीत बर्थडेबॉयला घडली तुरुंगवारी

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर भाईगिरी करणे महागात पडू शकते. याचाच प्रत्यय निगडी येथे आला. सराईत गुन्हेगाराने त्याच्या वाढदिवसानिमित्त फेसबुकवर एक पोस्ट केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. त्यामुळे त्याचा वाढदिवस त्याला पोलीस कोठडीत मनवावा लागला.

 

अजय विलास काळभोर (वय २७, रा. चिंचवड), अनिल प्रशांत सोनावणे (वय २४, रा. विद्यानगर, चिंचवड) आणि सोमनाथ राजू देवाडे (वय २१, रा. गणेशनगर, चिंचवड), अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय काळभोर याने त्याच्या वाढदिवसानिमित्त फेसबुकवर पोस्ट टाकली. कुछ दिन और सही, बहोत बडा धमाका होगा, पूरे पिंपरी चिंचवड मे अपनाही नाम होगा, अशा आशयाचा मजकूर त्या पोस्टमध्ये होता. तसेच त्याचा साथीदार प्रशांत सोनावणे यानेही त्याला शुभेच्छा देणारी पोस्ट टाकली. भाऊ आमचा, बाप तुमचा, अशी पोस्ट त्याने टाकली. तसेच आरोपी देवाडे हा अजय काळभोर याचे फेसबुक अकाऊंट हाताळत होता.

आरोपींनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टबाबत अपर पोलीस आयुक्तन रामनाथ पोकळे आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांना माहिती मिळाली. त्यांनी सराईत गुन्हेगार आणि त्याला शुभेच्छा देणाऱ्या प्रशांत सोनावणे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्तच डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या सूचनेनुसार गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.

तीनही आरोपींना बुधवारी अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायलयाने त्यांना चांगल्या वागणुकीची हमी घेत जामिनावर सोडून दिले. मात्र महिनाभर तीनही आरोपींना निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येण्यास मनाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here