मुंबई (प्रतिनिधी अकबर भाई) – कोरोनाच्या संकटात मास्क, सॅनिटायझर, इंजेक्शननंतर आता रुग्णांचे प्राण वाचविण्यास महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ऑक्सिजनच्या सिलिंडरची साठेबाजी केली जात असल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष ९ पथकाने जोगेश्वरी पश्चिम परिसरात एका गोदामावर छापा टाकून ऑक्सिजनचे २५ सिलिंडर व १२ ऑक्सिजन किट हस्तगत केले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आणखी आरोपींचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
गुन्हेशाखा कक्ष ९ येथील पो.नि. सुधीर जाधव यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खबरीनुसार ऑल इंडिया हेल्थ केअर, शॉप नं. १, फ्लॉयओव्हर खाली, मरर्कझ हॉटेलसमोर, हबीबी मस्जिदजवळ, जोगेश्वरी पश्चिम येथे भाड्याच्या गोडावूनमध्ये मेडीकल ऑक्सिजन सिलेंडरचा साठा करुन ठेवलेला असल्याची माहिती प्राप्त झाली.

प्राप्त माहितीनुसार पो.नि. सुधीर जाधव व त्यांच्या पथकाने औषध निरीक्षक निशिगंधा पष्टे यांच्यासह छापा टाकला असता, या ठिकाणी एक इसम आढळून आला. गोडावूनमध्ये पाहणी केली असता, या ठिकाणी विविध वजनाचे मेडीकल ऑक्सिजन भरलेले सिलेंडर व ऑक्सिजन किट आढळून आले. या इसमाकडे चौकशी केली असता, तो या मालाविषयी खरेदी बिल वा टॅक्स इनव्हाईस अशी कोणतीच माहिती देवू शकला नाही. तसेच त्याच्याकडे ऑक्सिजन सिलेंडर साठवणूक व विक्री संदर्भातील कोणताही परवाना आढळून आला नाही.
या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, गोडावूनमधून विविध वजनाचे ऑक्सिजन भरलेले पांढऱ्या रंगाचे ॲल्यूमिनीयमचे २५ सिलेंडर व १२ ऑक्सिजन किट असा अंदाजे ६ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त एस.विरेश प्रभू, पोलीस उपआयुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सिध्दार्थ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ९ बांद्रा येथील प्रभारी पो.नि. रविंद्र साळुंखे, पो.नि. सुधीर जाधव, किरण आहेर, सपोनि शरद धराडे, वाल्मिक कोरे, पोउनि श्रीराम घोडके, विजयेंद्र आंबवडे, रामदास कदम, पोलीस अंमलदार महेश नाईक, फकिरा शेख, दत्तात्रय कोळी, अमोल हाक्के, महेश मोहिते, प्राजक्ता धुमाळ, अविनाश झोडगे व शशिकांत निकम यांनी पार पाडली.






