कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता आपल्या मूळच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघात पराभव झाला आहे. त्यानंतरही मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यामुळे त्यांना सहा महिन्यांच्या आत आमदार म्हणून निवडून येणे आवश्यक आहे.
तृणमूल काँग्रेसचे शोभन देव चॅटर्जी हे ममता बॅनर्जी यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या भवानीपूर मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले आहेत. पण ममता बॅनर्जी यांना आमदार म्हणून सहज निवडून जाता यावे म्हणून आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे चॅटर्जी यांनी स्पष्ट केले आहे.
हा पक्षाचा निर्णय असून त्याचे पालन करणे माझे कर्तव्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी येथून तिसऱयांदा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधी त्यांनी 2011 आणि 2016 मध्ये भवानीपूर येथून विधानसभेची निवडणूक लढवली होती. दरम्यान, तृणमूलचे खारदाह विधानसभेचे आमदार काजल सिन्हा यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे शोभन देव खारदाह येथून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.






