राजधानी दिल्लीचे नाव बदलून ‘इंद्रप्रस्थ’ करण्याची भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची मागणी

नवी दिल्ली – भारताची राजधानी दिल्लीचे नाव बदलून ‘इंद्रप्रस्थ’ ठेवण्यात यावे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करून केली आहे. यासाठी त्यांनी द्रौपदी ट्रस्टच्या डॉ. नीरा मिसरा यांनी केलेल्या संशोधनाचा हवाला दिला आहे.

डॉ. स्वामी यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, डॉ. नीरा मिसरा यांच्या संशोधनातून सापडलेली तथ्ये राजधानी देहलीचे पुन्हा नामकरण करण्यासाठी पुरेशी आहेत. तमिळनाडूतील एका महान ऋषींनी मला सांगितले की, जोपर्यंत देहलीचे नाव पालटून ‘इंद्रप्रस्थ’ केले जात नाही, तोपर्यंत देशामध्ये वाद चालू रहातील.

डॉ. नीरा मिसरा यांनी त्यांच्या संशोधनामध्ये अनेक पुरावे गोळा केले आहेत, ज्याद्वारे देहलीचे पूर्वीचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ होते. यात महाभारताचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसेच वर्ष १९११ च्या इंग्रजांच्या अधिसूचनेमध्येही याचा उल्लेख आहे. ब्रिटीश, तसेच मोगल यांच्या शासन काळातील महसूल आणि अन्य नोंदीमध्ये देहलीचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ असल्याचेही उल्लेख आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here