ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशीलकुमारला अटक

नवी दिल्ली – भारतीय ऑलिम्पिक, जागतिक, आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकून देणारा कुस्तीपटू सुशीलकुमार याला नवी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मुंडका येथून अटक केली. युवा खेळाडू सागर धनखड याच्या हत्येप्रकरणी सुशीलकुमारला अटक करण्यात आली असून आता त्याला सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. सुशीलकुमारसोबत त्याचा सहकारी अजय यालाही अटक करण्यात आली आहे.

23 मे हा जागतिक कुस्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या चांगल्या दिवशी भारतात कुस्तीशी संबंधित वाईट घटना घडली ही खेदजनक बाब! सुशीलकुमारच्या अटकेनंतर भारतातील आजी- माजी क्रीडापटू, संघटनेचे पदाधिकारी यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. सुशीलकुमार हा कुस्तीपटू दिग्गज खेळाडू आहे, या घटनेमुळे खेळाचे तसेच यामध्ये करीअर करू इच्छिणाऱ्या युवा खेळाडूंचे नुकसान होईल असे काहींचे म्हणणे आहे. काहींना वाटते आहे की, सुशीलकुमारवर आता आरोप झाले आहेत. अजून ते सिद्ध व्हायचे आहेत. काही म्हणताहेत की, क्रिकेटमध्येही मॅचफिक्सिंग झाली, पण खेळ सुरू राहिला. तसेच कुस्तीमध्येही होईल.

सागर धनखड हा नवी दिल्लीतील ज्या घरामध्ये राहत होता ते घर खाली करण्यासाठी सुशीलकुमार त्याच्यावर दबाव टाकत होता. सागर धनखड त्या घराचे भाडेही देत नव्हता. याचदरम्यान सागर धनखड याने सुशीलकुमारला बदमाश म्हणून सर्वांसमोर हिणवले होते. यावेळी युवा खेळाडू आपली छबी खराब करतोय असे सुशीलकुमारला वाटले. यानंतर 4 मे रोजी सुशीलकुमार आणि त्याच्या सहकाऱयांनी सागर धनखड व त्याच्या मित्रांचे अपहरण केले. छत्रसाल स्टेडियममध्ये नेऊन त्यांना मारहाण केली. या मारहाणीत पाच कुस्तीपटू जखमी झाले. यामध्ये सागर, सोनू व अमित यांच्यासह इतर दोघांचा समावेश होता. यानंतर सागर धनखड याचे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले.

सुशीलकुमार व त्याचे सहकारी हॉकी स्टिकने सागर धनखड व त्याच्या मित्रांना मारत असल्याचा पुरावा दिल्ली पोलिसांना मिळाला. तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सर्व कैद झाले. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांकडून पुढे सांगण्यात आले की, सुशीलकुमारने मारहाणीचा व्हिडीओही तयार केला होता, जेणेकरून सुशीलकुमारचा प्रभाव या क्षेत्रात कायम राहील. या घटनेनंतर सुशीलकुमार फरार झाला होता. यानंतर दिल्ली पोलिसांसह क्राईम ब्रँचच्या विशेष पथकाने पंजाबमधील भटिंडासह मोहाली आणि इतर ठिकाणी छापेमारी केली, पण सुशीलकुमार काही सापडला नाही. सुशीलकुमारला पकडण्यास मदत करणाऱयाला एक लाखाचे बक्षीस देण्यात येईल असे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले.

अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सुशीलकुमार याने याचिका दाखल केली होती, पण रोहिणी कोर्टाकडून ही याचिका फेटाळण्यात आली. सुशीलकुमारवर हत्या, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता सुशीलकुमार व अजय या दोन्ही आरोपींना नॉर्थ वेस्ट जिल्हय़ातील पोलीस ठाण्यात पाठवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here