नवी दिल्ली – गेल्या अनेक दिवसांपासून सीबीआयचे प्रमुखपद हे रिक्त होते अखेर त्या जागेवर आयपीएस सुबोधकुमार जयस्वाल यांची निवड करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी सुबोधकुमार जयस्वाल यांची सीबीआयच्या संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. याआधी ‘महाराष्ट्र पोलिस विभागाच्या’ महासंचालक पदावर ते राहिले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुख्य न्यायाधीश एन.व्ही. रमणा आणि कॉंग्रेसचे लोकसभेचे नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय समितीने आणि आयपीएस अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे संचालक म्हणून नियुक्त केले. महाराष्ट्र केडरमधील 1985 च्या तुकडीचे अधिकारी सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.
सुबोध कुमार यापूर्वी दिल्लीत भारताची गुप्तचर संस्था म्हणजे रिसर्च अँड अँनालिसिस विंगमध्ये काम केले आहे. दत्ता पडसलगीकर यांचा मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर फडणवीस सरकारच्या काळात सुबोधकुमार जयस्वाल यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. फेब्रुवारी २०१९ ते जानेवारी २०२१ म्हणजे जवळपास २ वर्षांचा त्यांचा महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदाचा अनुभव आहे.
याशिवाय ते मुंबईचे माजी पोलिस आयुक्तही होते. जुलै २०१८ मध्ये ते मुंबईच पोलिस आयुक्त झाले. त्यांनतर सुबोध कुमार जयस्वाल यांनी महाराष्ट्र दहशतवादविरोधी विभागातही काम केले आहे. महाराष्ट्रातील २० हजार कोटींच्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याप्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाचे सुबोध कुमार जयस्वाल हे प्रमुख होते.






