दुचाकीला धक्का लागून दूध सांडल्याच्या कारणावरून अहमदनगरला दोन गटांत तुंबळ हाणामारी

अहमदनगर (प्रतिनिधी) – दुचाकीला धक्का लागल्यानं एका दूध विक्रेत्याच्या कॅनमधील दूध सांडल्याचे निमित्त होऊन पाथर्डीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही बाजूंचे आठ जण जखमी झाले आहेत. शिरसाठवाडी आणि भिकनवाडा या भागात राहणारे जुनी भांडणे असलेले हे दोन गट समोरासमोर भिडले. दूध सांडल्याच्या कारणातून सुरू झालेली ही मारामारी एकमेकांचे रक्त सांडेपर्यंत झाली. यामध्ये संबंधितांच्या तसेच अन्य नागरिकांच्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले.

पाथर्डीतील अजंठा चौकात मंगळवारी रात्री ही घटना घडली. दोन्ही बाजूंच्या लोकांनी फिर्यादी दिल्या असून रात्री उशिरा पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या लॉकडाउन असल्याने दुकाने बंद आहेत. मात्र, स्टॉल लावून दूध विक्री सुरू आहे. शहरालगतचे दूध विक्रेते शहरात येऊन चौकात दुचाकी वाहने उभी करून दूध विकतात. मंगळवारी रात्रीही अशीच विक्री सुरू होती. तेव्हा शिरसाठवाडी येथील एका दूध विक्रेत्याला भिकनवाडा येथील एका दुचाकीचा धक्का लागला. त्यावरून वाद वाढत गेला. या दोन भागातील नागरिकांची यापूर्वीही अनेकदा भांडणे झाली आहेत. त्यामुळे काही वेळातच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि हाणामारी तसेच दगडफेक झाली. यामध्ये वाहनांचेही मोठे नुकसान झाले. पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले. दोन परस्पर विरोधी फिर्यादी दाखल असून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या घटनेमुळे चौकात मोठी धावपळ उडाली. चौकात उभ्या असलेल्या अन्य नागरिकांच्या वाहनांचेही नुकसान झाले. पाथर्डी पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here