मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सहा नगरसेवक शिवसेनेत; आणखी चार नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर
जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – येथील नगरपंचायतीमधील माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे समर्थक असणारे सहा नगरसेवकांनी आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश घेतल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर चार नगरसेवक उद्या प्रवेश घेणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अपात्रतेच्या भीतीमुळ हे नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले.
मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असुन, नजमा तडवी लोकनियुक्त नगराध्यक्षा आहेत. यासोबत भाजपचे 13 नगरसेवक निवडून आले होते. हे सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टी चे सदस्य असले तरी खडसे गटाचे समर्थक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अपात्रतेची भीती व विकास कामांमुळे धुसफूस सुरू होती. त्याचा परिणाम आज दिसून आला. मुक्ताईनगर नगरपंचायतीतील दहा नगरसेवक हे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी मुंबईत मातोश्रीवर सहा नगरसेवकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले.
अपात्रतेच्या भीतीमुळे प्रवेश- एकनाथराव खडसे
शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांना अपात्रतेची व गैरव्यवहार प्रकरणी कारवाई ची भीती सतावत असल्यामुळे त्यांनी प्रवेश केला असे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी सांगितले. यातील एका नगरसेवकाला चार मुले, दोघांचे अतिक्रमण तर एका नगरसेवकाच्या जातीच्या दाखल्याच्या अडचणी आहेत. त्यांना अपात्रतेची भीती सतावत असून जिल्हाधिकाऱ्यांकडे 1 जून रोजी या प्रकरणातील सुनावणी होणार आहे. त्याचप्रमाणे नगराध्यक्षांना वारंवार त्रास देणे व गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या नगरसेवकांच्या प्रवेशामुळे आपल्यावर कोणताही परिणाम होणार नसून, नगराध्यक्ष व आठ नगरसेवक आपल्यासोबत आहेत, असा दावा नाथाभाऊ यांनी केला.






