नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन करणं एका शिवसेना नेत्याला भोवलं आहे. नवी मुंबईत माजी नगरसेवक सुरेश कुळकर्णी यांनी वाढदिवसानिमित्त शहरातील मुख्य वर्दळीच्या भागातच गर्दी जमवून वाढदिवसाचा जल्लोष केला होता.
सुरेश कुळकर्णी यांनी तूर्भे परिसरात गजबजलेला रस्ता अडवून फटाक्यांची आतषबाजी केल्यानंतर त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याबाबत एमआयडीसी तूर्भे पोलिसांनी अखेर सुरेश कुळकर्णी यांच्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी तूर्भे पोलिसांनी कलम 188, 269, 270 यांसह साथीचे रोग अधिनियम 1897 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे
तुर्भे स्टोअर येथील ठाणे बेलापूर रस्ता अडवून शिवसेना नेते सुरेश कुळकर्णी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली करण्यात आली. फटाके फोडून आतषबाजी केल्याचे फोटो-व्हिडीओही समोर आले आहेत. विशेष म्हणजे परिसरातील शेकडो नागरिक आणि पोलीस देखील उपस्थित होते.






