पुण्यात रेल्वेनं प्राण्यांची तस्करी; दोन व्यक्तींना पोलिसांनी केली अटक

बॅगेत सापडले कासव, सरडे आणि फायटर फिश

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पुण्यामार्गे मुंबईला चाललेल्या चेन्नई एक्स्प्रेसमध्ये आफ्रिकन प्रजातीचे २७९ कासव, इग्णूआ जातीचे १२०७ सरडे आणि २३० बेटा फिशच्या तस्करीचा प्रकार समोर आला आहे. पुणे लोहमार्ग पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, सर्व प्राणी परदेशी असल्याने खळबळ उडाली आहे.

पुणे लोहमार्ग अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत विविध मार्गावर रेल्वे गाड्यांमधून विनापरवाना मालाची आणि प्राण्यांची तस्करी होत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाल्याने लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मौला सय्यद यांना या प्रकरणाचा तपास करण्याची सूचना केली.

यानुसार, सय्यद यांनी रेल्वे गाड्यात पेट्रोलींग स्टाफ नेमला. सय्यद यांनी चार वेगवेगळ्या टीम तयार करून आठ ते दहा दिवसांपासून वेगवेगळ्या मार्गावरील रेल्वे गाड्यात पेट्रोलींग केलं. पुणे ते लोणावळा दरम्यान चेन्नई – एलटीटी एक्सप्रेस या गाडीत पेट्रोलींग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गाडीच्या ए-१ बोगीमध्ये सीट ९ आणि ११ वरून प्रवास करणाऱ्या व्यक्ती तरूणकुमार मोहन (वय २६, रा. वर्षे- चेन्नई) आणि श्रीनिवासन कमल (वय २०, रा. तामीळनाडू) यांच्याकडे एकूण चार ट्रॅव्हल बॅग आणि दोन संगवेग आढळून आल्या.

लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांना त्याबाबत संशय आल्याने त्यांनी बॅग तपासून पाहिली. तर, त्यात कासव, सरडे आणि फायटर फिश असल्याचं दिसून आलं. त्याबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा वाहतुकीचा परवाना आणि कागदपत्रे नव्हती. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना प्राण्यांसह ताब्यात घेतलं.

लोहमार्ग पोलीस अधीक्षक वायसे पाटील, अतिरिक्त अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मौला सय्यद, सहायक निरीक्षक अंतरकर, सहायक फौजदार सुनिल भोकरे, जगदेश सावंत, हवालदार सुनिल कदम, सुहास माळवदकर आदींनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here