बिल्डर युसूफ लकडावाला यांची ईडी चौकशी, हैदराबादच्या नवाबाची खंडाळ्यातील जमीन लाटल्याचा आरोप

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – चित्रपट निर्माते आणि बांधकाम व्यावसायिक युसूफ लकडावाला यांची अंमलबजावणी संचलनालयाकडून चौकशी करण्यात आली. हैदराबादच्या नवाबाची खंडाळा येथील 50 कोटी रुपयांची जमीन अल्प किमतीत लाटल्याचा आरोप आहे. खंडाळ्याच्या या जमिनीशी संबंधित बिल्डरच्या काही संशयास्पद व्यवहारांची ईडी चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बिल्डर युसूफ लकडावाला यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून गुरुवारी चौकशी करण्यात आली. युसूफ लडकावालांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरुन ईडी कार्यालयात आणलं होतं. युसूफ लकडावाला यांच्याविरोधात एप्रिल 2019 मध्ये आर्थिक गुन्हे विभागाने गुन्हा दाखल केला होता. हाच गुन्हा आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे नोंदवून तपास सुरु केला आहे.

पुणे जिल्ह्यातील खंडाळा येथे हैदराबादचे नवाब हिमायत नवाज जंग बहादूर (Hyderabad Nawab Himayat Nawaz Jung Bahadur) यांच्या मालकीच्या जमिनीशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंगचे हे प्रकरण आहे. ही जमीन 50 कोटी रुपयांची असल्याचे म्हटले जाते. मात्र लकडावाला यांनी जमीन ताब्यात घेण्यासाठी सरकारी अधिकारी, इस्टेट एजंट्स आणि इतर आरोपींना सुमारे 11.5 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. अधिकृत नोंदीनुसार सर्व्हे नंबर 104 (सीटीएस नंबर 11, 11A, 11B) वरील जागा 4 एकर आणि 38 गुंठ्यांची आहे.

मावळ तालुका उपनिबंधक जितेंद्र बडगुजर यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर लकडावाला आणि इतरांविरूद्ध फसवणूक, कट रचणे अशा आरोपांखाली भादंवि कलम 465, 466, 467, 468, 471, 420, 120-B आणि 201 नुसार, तर भारतीय नोंदणी अधिनियम कलम 82 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

76 वर्षीय युसूफ लकडावाला यांनी गुरुवारी ईडी कार्यालयात जबाब नोंदवला. याआधी अनेक वेळा समन्स बजावूनही लकडावाला चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. याआधी, अभिनेत्री साधना यांच्या राहत्या जागेला बळकावून धमकावल्याबद्दल युसूफ लकडावाला आणि त्यांच्या पत्नीला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here