पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – कोरोना काळात रुग्णांकडून भरमसाठ बिलं वसूल करण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णांची लूट थांबवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रुग्णालयांकडून देण्यात येणाऱ्या प्रत्येक वैद्यकीय बिलाचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.
यापूर्वी दीड लाख रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय बिलांचे लेखापरीक्षण करण्यात येत होते. आता सरसकट सर्व बिलांचे लेखापरीक्षण केले जाणार आहे. त्यासाठी रुग्णालयांमध्ये लेखापरीक्षक नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान, आतापर्यंत पुण्यात रुग्णालयांनी घेतलेल्या वैद्यकीय बिलांपैकी सुमारे नऊ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर रुग्णालयांनी दिलेल्या ८१२५ वैद्यकीय बिलांचे पूर्व लेखापरीक्षण करण्यात आले असून, या बिलांमध्ये आकारलेले सुमारे १२ कोटी ७६ लाख रुपये कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.
राज्यात मासिक पाळीविषयी जनजागृती आणि सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यासाठी ‘उन्नती उपक्रम’ सुरू करण्यात येणार आहे. मासिक पाळी दिवसानिमिताने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची अधिक माहिती आणि अंमलबजावणी याविषयीचा अध्यादेश येत्या दोन दिवसांत काढण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सॅनिटरी पॅडचे वाटप करावे, असं आवाहन करण्यात येणार आहे. मोठ्या कंपन्यांनी जिल्हे दत्तक घ्यावेत, असंही सुचवण्यात आलं आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.






