सिंहगड रोड पोलिसांची मोठी कारवाई; सराईत वाहन चोरटा जेरबंद, इनोव्हा कारसह दुचाकी जप्त

सिंहगड रोड

पुणे (संपादक सुहास गायकवाड) |  सिंहगड रोड पोलिसांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यात एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीची एक ‘टोयोटा इनोव्हा क्रिस्टा’ कार आणि एक मोटारसायकल असा एकूण १२,४८,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 

१५ एप्रिल २०२६ रोजी सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा (क्र. MH 12 YS 6364) चोरीला गेली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिंहगड रोड परिसरात वाहन चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि ७० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

तपास सुरू असताना पोलीस अंमलदार उत्तम तारू, राहुल ओलेकर आणि सागर शेडगे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, चोरीच्या गाडीसह एक संशयित व्यक्ती शरद हॉस्पिटलकडून प्रयोजा सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबली आहे. सापळा रचून पोलिसांनी गौरव जनार्दन कडू (वय ३२, रा. कुरण बु||, ता. वेल्हे, सध्या रा. नांदेड गाव) याला ताब्यात घेतले. तपासणी दरम्यान, त्याच्याकडे असलेली मोपेड गाडीही त्याने एका वर्षापूर्वी नांदेड सिटी येथील पार्किंगमधून चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्या घरझडतीमध्ये पोलिसांनी चोरीसाठी वापरलेली बनावट चावीदेखील जप्त केली आहे.

ही कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) समीर गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष भांडवलकर आणि तपास पथकातील कर्मचारी उत्तम तारू, अण्णा केकाण, विकास बांदल, सतिश मोरे, राहुल ओलेकर, सागर शेडगे, तानाजी सागर, संदिप कांबळे, समीर माळवदकर, विनायक मोहिते व शिरीष गावडे यांचा समावेश होता. सिंहगड रोड पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here