पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकण उत्तर पोलीस स्टेशन अंतर्गत राक्षेवाडी येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या बांधकाम साईटवरून सुमारे २० लाख रुपये किमतीच्या २८० स्क्वेअर मीटर ॲल्युमिनीयम सेट्रींग प्लेट्स चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चोरीचे साहित्य खरेदी करणाऱ्या तीन आरोपींसह एकूण ७ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ३१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १० एप्रिल ते १६ एप्रिल २०२६ या कालावधीत राक्षेवाडी येथील २१० घरांच्या बांधकाम साईटवरून अज्ञात चोरट्यांनी ॲल्युमिनीयम प्लेट्स चोरल्या होत्या. याप्रकरणी १८ एप्रिल रोजी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस तपासादरम्यान घटनास्थळी एक बेवारस मोटारसायकल मिळून आली. त्या मोटारसायकलचा तांत्रिक तपास आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर मुख्य आरोपी रामरक्षा उर्फ राजू धर्मराज पासवान (रा. सुसगाव, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारांची नावे सांगितली.
या प्रकरणी पोलिसांनी रामरक्षा उर्फ राजू धर्मराज पासवान (वय ४०), स्वराज शांताराम कालापाड (वय २३, रा. येलवाडी), स्वप्नील शांताराम कालापाड (वय २५, रा. येलवाडी), अक्रम रफिकउल्ला खान (वय २८, रा. येलवाडी) यांना अटक केली असून, चोरीचा माल विकत घेणाऱ्या अन्य ३ आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याजवळून चोरीस गेलेल्या ॲल्युमिनीयमच्या सेट्रींग प्लेट्स, गुन्ह्यात वापरलेली दोन चारचाकी वाहने, दोन मोटार सायकली असा एकूण ३१,१०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड आणि बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उप आयुक्त मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक विनोद पाटील आणि तपास पथकातील उप निरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे व त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे करत आहेत.







