मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – नरेंद्र मोदींनी 2014 च्या निवडणुकीत जनतेला खोटी स्वप्ने दाखवून सत्ता मिळवली पण सात वर्षात मोदी सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकार सपशेल अपयशी ठरल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
ते रविवारी मुंबईतील आंदोलनावेळी बोलत होते. पहिल्या लाटेत मोदी नमस्ते ट्रम्पच्या आयोजनात व्यस्त राहिले आणि परिस्थिती अंगलट येताच तबलीगीच्या नावावर कोरोनाचे खापर फोडून धार्मिक रंग देण्याचा उद्योग केला तर दुसऱ्या लाटेतही कोरोनाचे रुग्ण व मृत्यू वाढत असताना मोदी सरकार विधानसभेच्या प्रचारात दंग होते. मोदींनी आपल्या मनमानी कारभाराने 130 कोटी जनतेला कोरोनाच्या खाईत लोटले, त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नसून मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काराभाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज जिल्हा-तालुका स्तरावर काळ्या फिती लावून निदर्शने केली तसेच मोदी सरकारचा निषेध केला. मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यभर काँग्रेसने काळा दिवस पाळून मोदी सरकारचा निषेध केला. तसेच प्रत्येक विभागात काँग्रेसच्या वरिष्ठ नेते व मंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल केली. पुणे येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नाशिकमध्ये विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, औरंगाबाद येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नागपूरमध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत, अमरावती येथे मंत्री विजय वडेट्टीवार, लातूरमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, कोल्हापूरमध्ये गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर टीका केली.






