सर्व १५१ रक्तदाताचे आझाद गणेश मंडळ तर्फे आभार
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – बार्शी येथील आझाद गणेश मंडळाच्या वतीने कै.नागेश गाढवे आणि कै.ओंकार नरके यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 151 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रामलिंग गाढवे आणि रामलिंग नरके यांच्याहस्ते आजोबा गणपतीचे पूजन करून कै. नागेश व ओंकार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराची सुरूवात झाली. यावेळी नगरसेवक पृथ्वीराज राजपूत, माजी नगरसेवक संजय बरीदे उपस्थित होते. गर्दी न करता, सामाजिक अंतर पाळून हे शिबीर राबविण्यात आले.
कोरोना विषाणू महामारीची दुसरी लाट ओसरू लागली आहे. मात्र, अद्यापही रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेत आहेत. त्या, पार्श्वभूमीवर हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. कै. मधुकर नरके यांनी 1999 साली सर्वप्रथम रक्तदान शिबीर आयोजित केले तेंव्हापासून सलग 21 वर्षांपासून या समाजोपयोगी उपक्रमाची परंपरा जोपासण्यात आली आहे. तसेच नागेश गाढवे यांच्या स्मरणार्थ आयोजनाचे 7 वे वर्ष आहे. नागेशचा मित्रपरिवार आणि आझाद गणेश मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जणांनी रक्तदान केले. रक्तदात्याचे सॅनिटायझेशन करून थर्मल स्क्रिनींगद्वारे शरीराची ताप तपासणी करण्यात आली. प्रत्येक रक्तदात्यास उत्तम दर्जाचा मास्क भेट देत काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले. महिलांनीही रक्तदान शिबीरात सहभाग घेतल्याचे दिसून आले.
शिबीरास शहरातील अनेक मान्यवर व पत्रकारांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत रक्तदाते उत्स्फूर्त सहभाग नोंदवत होते. या शिबीरासाठी लखन राजपूत, कुणाल नरके, रुपेश सदावर्ते, सागर शिराळ, राम गलांडे, राहुल शिराळ, राहुल गुजर, बाबा नरके, गणेश गलांडे, महेश देसाई, ओंकार घोंगडे, राज ढोले, संतोष खोगरे, रामसिंग राजपूत, विकी ठाकूर, करण राजपूत, सोनल शिराळ, सुदर्शन शिराळ, रोहित गलांडे, सूरज गायकवाड, अक्षय कवडे यांनी परिश्रम घेतले. श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीच्या स्टाफने कामकाज पाहिले.






