आमदाराच्या मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमात अधिकाऱ्याचा भन्नाट डान्स; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, कारवाई होणार?

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे बेफाम नाचतानाचा व्हिडीओ काल समोर आला. या व्हिडीओनंतर आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी सुनील बेळगावकर हे आमदार लांडगे यांच्यासोबत नृत्य करताना दिसत आहेत.

आमदारांच्या कन्या साक्षी लांडगे यांच्या विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित विधींच्या वेळी लांडगेंनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नृत्य केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत इतरांनीही नृत्य केलं. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी देखील सहभागी होते. संबंधित घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आमदार आणि अधिकारी दोघांवर आता टीकेची झोड उठत आहे.  https://fb.watch/5Rj5Pnhiwu/

पिंपरीत कोरोनाचे नियम पाळावेत यासाठी ज्या महापालिकेनं जनजागृती करणं गरजेचं असतं त्याच महानगरपालिकेचे अधिकारी स्वतः नियमांना तिलांजली देत आहेत. दुसरीकडे महापालिका तक्रार आल्यानंतर कारवाई करू, अशी पळवाट शोधत आहे. सर्वसामान्यांवर मात्र कोणाच्या नियमाची पायमल्ली केल्यानंतर सर्रासपणे कारवाई केली जात आहे. मग लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका अधिकारी यांच्याबाबत उदासीनता का? असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here