पुणे जिल्ह्यात एकाच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केल्या तीन कारवाया

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी जिल्ह्यात एकाच दिवशी तीन कारवाई केल्या आहेत. तळेगाव दाभाडे परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यावर 9 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. तर, शिरूर येथे एका सहायक निबंधक सहाकारी संस्थेच्या अधिकाऱ्याला हजाराची लाच घेताना पकडले. पुण्यातील एका सरकारी वकिलाला 10 हजार रूपयांची लाच घेताना अटक केली आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदच्या हद्दीत तक्रारदार यांना काही कामे मिळाली होती. त्यांनी केलेल्या चार कामांचे बील काढण्यासाठी नगरपरिषदेचे सीईओ शाम लक्ष्मण पोशेट्टी (वय 44) यांच्या सांगण्यावरून उद्यान पर्यवेक्षक विशाल अंकुश मिंड (वय 33) याने तक्रारदार यांना 9 लाख रूपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत शिरुर येथील शिवाजी महादु गव्हाणे (वय 56) याना 15 हजार रूपयांची लाच घेताना अटक केली आहे. गव्हाणे हे शिरूर मधील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात सहकार अधिकारी आहेत. यातील तक्रारदार यांनी त्यांचा सावकारी परवाना नुतणीकरणासाठी अर्ज केला होता. त्यावेळी लोकसेवक गव्हाणे यांनी वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर तक्रारीची पडताळणी केली. त्यावेळी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गव्हाणे याना 15 हजार रूपयांची लाच घेताना पकडण्यात आले. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या कारवाईत कौटुंबिक न्यायालयातील एका वकिलास 10 हजार रूपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. हरिकिसन श्रीरामजी सोनी (वय 57) असे पकडण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील महिला तक्रारदार यांचा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा वाद सुरू आहे. या दाव्यात शासनाने सोनी यांना वकील म्हणून नेमणूक केली होती. यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. यातक्रारीवर एसीबीकडून पडताळणी करण्यात आली. त्यावेळई लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सोमवारी 10 हजार रूपयांची लाच घेताना सोनी याना पकडण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here