मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सात लाखांहून अधिक रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यास आज राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यावर सुमारे 107 कोटी रुपये खर्च होणार आहेत.
राज्यात कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकार विविध उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सात लाख 15 हजार रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला पूर्वीच मंजुरी देण्यात आली होती. आता याबाबतचा शासन आदेश जारी झाला आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही रक्कम रिक्षाचालकांच्या बँक खात्यात थेट जमा होईल.
कोरोनामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. या सर्वांना राज्य सरकारने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. रिक्षाचालकांना आता आर्थिक मदत केली आहे. त्यापूर्वी राज्य सरकारने घरकाम करणारे कामगार आणि बांधकाम करणाऱ्या मजुरांनाही आर्थिक मदत दिली आहे.






