पुस्तकांच्या दुकानांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करावा – नीलम गोऱ्हें

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – कोरोना संकट काळात एकटे राहणे, कुटुंबीयांवर कोरोनाचा आघात होणे, कोरोनामुक्त झाल्यावर घरातच थांबावे लागणे अशा परिस्थितीत लोकांचे मनोबल वाढविणे अतिशय गरजेचे आहे. हे मनोबल वाढविण्यासाठी साहित्य मोठी भूमिका बजावत असते आणि साहित्यातून माणसाला उमेदही मिळत असते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर दुकानांचा अत्यावश्यक सेवेत समावेश केला आहे. त्याचप्रमाणे पुस्तकांच्या दुकानांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याची विनंती विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री सुभाषजी देसाई, नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्र देऊन केली आहे.

गेले पंधरा महिने कोरोनामुळे समाजाची गती फार मोठ्या प्रमाणात मंदावलेली आहे. उद्योग क्षेत्राला जसा त्याचा फटका बसला असला तरीसुद्धा राज्य सरकारने उद्योग चालू ठेवण्यासाठी पराकाष्ठा केली आहे. कोरोना ग्रस्तांची संख्या आता कमी होण्याची चिन्हे अनेक जिल्ह्यांमध्ये दिसत आहेत आणि त्यामुळे चोवीस शहरात दुकानांच्या वेळा वाढविण्यात आल्या आहेत.

त्यानुसार दुपारी दोनपर्यंत दुकानांना परवानगी दिलेली आहे. त्याचप्रमाणे पुस्तकांची जी दुकाने आहेत आणि विशेषतः वेगवेगळ्या प्रकारची मराठी साहित्यांची दुकाने आहेत, ती आणि अन्य भाषिक पुस्तकांची दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here