बारावीच्या परीक्षांबाबत आजही निर्णय नाहीच

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – करोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर CBSE बोर्डाने इयत्ता १२वी च्या परीक्षा रद्द केल्या. यानंतर देशातील अनेक राज्यांनी देखील आपापल्या राज्यातील १२वी च्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घोषित केला. यामुळे महाराष्ट्रातील इयत्ता १२वी च्या परीक्षांबाबत कोणता निर्णय घेतला जातो याबाबतची उत्सुकता विद्यार्थी, पालक व शिक्षकांना लागली आहे.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात येईल अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र या बैठकीनंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतचा निर्णय येत्या एक-दोन दिवसात घेतला जाईल असे सांगितल्याने १२ वी परीक्षांबाबतच्या निर्णयाची उत्सुकता आजही कायम राहिली आहे.

दरम्यान, याबाबत बोलताना शालेय शिक्षण मंत्र्यांनी, ‘शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला ही फाईल पाठवत आहोत. आज किंवा उद्या त्यांची बैठक होईल. त्यात ते फाईलवर निर्णय घेतील आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला अतिरिक्त माहिती देऊ. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व निर्णय हे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतले जात आहेत. त्यानुसार आम्ही ती फाईल त्यांच्याकडे पाठवली आहे’ अशी माहिती दिली.

‘करोनाच्या परिस्थितीमध्ये १२वीची परीक्षा २३ एप्रिलला होणार होती. ती आम्ही मे अखेरपर्यंत पुढे ढकलली. त्यानंतर देखील करोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीत ती पुन्हा पुढे ढकलली. केंद्रानं मंगळवारी सीबीएसईची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.’ ‘मुख्यमंत्र्यांनी देखील केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकांमध्ये सूसूत्रता असायला हवी असं म्हटलं होतं. या सर्व बाबींविषयी मंत्रिमंडळाला आज अवगत करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच राज्य सरकारची भूमिका राहिली आहे. आता आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर त्यासंदर्भात निर्णय जाहीर करण्यात येईल’ अशी माहिती त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here