‘बाहेर जाऊन बसा’, खासदार जलील यांनी महिला पोलिसाच्या हातावर मारला फटका

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – या ना त्या मुद्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. दुकानावर कारवाई का केली म्हणून कामगार आयुक्तांना जाब विचारण्यासाठी गेले असता, चित्रिकरण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हातावर फटका मारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

शहरात लॉकडाऊनच्या दुकानं सुरू ठेवणाऱ्या दुकानदारावर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई केली होती. त्यामुळे संतापलेले इम्तियाज जलील थेट कामगार आयुक्तांच्या कार्यालयात दुकानदारांना घेऊन पोहोचले.

यावेळी कामगार आयुक्तांच्या कार्यालयात सोशल डिस्टिंगचा पुरता फज्जा उडाला होता. लोकांनी एकच गर्दी केली होती. एक महिला पोलीस कर्मचारी जमलेल्या जमावाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होत्या. चित्रिकरण करत त्या जलील यांच्यापर्यंत पोहोचल्या. तेव्हा जलील यांनी मोबाईल खाली पाडण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांचा हातावर फटका मारला. त्यामुळे मोबाईल खाली पडला. एवढंच नाहीतर, ‘आम्ही काय मनोरंजनासाठी, चित्रपट पाहायला नाही आलो. जमत नसेल तर बाहेर उभे राहा, अशा शब्दांत महिला पोलीस कर्मचाऱ्यांना जलील यांनी सुनावले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here